Ahmednagar News : बिहारी तरुणाने मुलीला फूस लावून आणले, तरुणासह नातेवाईकाकडून अत्याचार..गावकऱ्यांना समजताच शेकडो लोक जमा होत दिला बेदम चोप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख आहे असाच आहे. अत्याचार, मारहाण आदी घटना वाढतच आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे मोठी खळबळ उडवून देणारी घटना घडली.

फूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन तरुणीवर बिहार येथील एका तरुणाकडून तसेच इतर नातेवाईकाकडून अत्याचार सुरू असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली. शेकडो लोक जमा झाले.

नागरिकांनी या तरुणास चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले. अफताब बादशाह साई, वय १९ रा. मोतीरामपूर (बिहार) असे आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी : आरोपीने बिहारमधील इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून राहुरी येथे पळवून आणले होते. मागील चार महिन्यांपासून हा तरुण पीडित मुलीला घेऊन तालुक्यातील ब्राम्हणी येथील नातेवाईकाच्या घरी राहत होता. या दरम्यान संबंधित तरुणाच्या नात्यातील दुसऱ्या एक तरुणाने या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही आपबिती पीडित मुलीने तिच्या बिहार येथील बहिणीला फोनवरून दिली.

माहिती मिळताच पीडित मुलीची बहिण शनिवारी राहुरी ब्राम्हणीमध्ये आली. पीडितेने यावेळी सर्व हकीकत बहिणीला सांगितली. या घटनेची माहिती ब्राम्हणी परिसरात पसरताच शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झाले. जमावाने संबंधित तरुणाची धुलाई करत त्याला राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

मुलीच्या नातेवाईकांनी पीडित मुलगी चार महिन्यांपासून बिहार येथून बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या फिर्यादीवरून बिहारच्या मोतीरामपूर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.