निळवंडेच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन ! ऐन दुष्काळात पिण्याच्या आणि शेती पाण्यापासून वंचित…

Ahmednagarlive24 office
Published:

निळवंडे डाव्या कालव्याची दुसरी चाचणी बंद करण्याआधी लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव, के.टी. वेअर प्रस्तावित चाऱ्यांच्या माध्यमातून भरून द्यावे, या मागणीसाठी निळवंडे कालवा कृती समितीच्या वतीने घुलेवाडी येथील जलसंपदा कार्यालयासमोर काल गुरूवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी निळवंडे कालवा कृती समितीचे पदाधिकारी व शेतकरी जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली. डाव्या कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी ऐन दुष्काळात पिण्याच्या आणि शेती पाण्यापासून अद्याप वंचित आहेत.

नेते निवडणुका पाहून आपल्या मत पेट्या कशा भरवायच्या याचा ५३ वर्षांपासून विचार करून शेतकऱ्यांना फसवत आहे. आता या अनिष्ठ प्रथा त्यांनी बंद कराव्या, अन्यथा त्यास दुष्काळी जनता उत्तर दिल्याशिवाय रहाणार नाही, असा इशारा भागवतराव आरोटे यांनी यावेळी दिला.

कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे यांनी अर्धवट उजव्या कालव्याचे काम भूसंपदनासह तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी केली. निळवंडे डाव्या कालव्याच्या दुसर्‍या चाचणीत पाणी शेतकऱ्यांना कमी आणि भंडारऱ्याच्या लाभक्षेत्रात जलजीवन मिशनच्या पाईपने जास्त चोरले जात असून अधिकारी त्याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

याप्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले, डॉ. विजय शिंदे यांनी मनोगत व्यक्‍त केले. दुष्काळी भागातील सर्व बंधारे, पाझर तलाव आगामी पंधरा दिवसात भरून दिले जातील, असे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

याप्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे, मच्छिद्र दिघे, माजी उपाध्यक्ष रमेश दिघे, संघटक नानासाहेब गाढवे, सचिव कैलास गव्हाणे, उत्तमराव जोंधळे, तानाजी शिंदे, रमेश दिघे, कौसर सय्यद, रावसाहेब मासाळ, सुधाकर शिंदे, अशोक गव्हाणे, सखाहारी थोरात, डॉ. विजय शिंदे, पंडित चासकर, नानासाहेब गाढवे आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित होते. प्रारंभी गंगाधर रहाणे यांनी प्रास्तविक केले. तर कौसर सय्यद यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe