दिव्यांग प्रमाणपत्रांची बनावटगिरी शोधाच; यांनी दिले एसपींना निवेदन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करणार्‍या आरोपींना अटक करून दलालाचा शोध घेण्याच्या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मणराव पोकळे, जिल्हा सचिव हमीद शेख, किशोर सूर्यवंशी आदी उपस्थित होते. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरून दिव्यांग व्यक्तींसाठी असणारा लाभ घेण्याचा प्रकरणाबाबत जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी यांनी फसवेगिरी करणार्‍या चार व्यक्तींविरुद्ध फसवणीचा गुन्हा दाखल केलेला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी विक्रम विष्णुकांत राठी (रा. कोपरगाव), सुनिल खंडु पवार (रा. सुरेगाव ता. कोपरगाव), विश्‍वनाथ ग्यानदेव फाळके (रा. निंबोडी ता. कर्जत),

महेश दशरथ मते (रा. सावेडी, अहमदनगर) यांना तात्काळ अटक करून त्यांनी बनावट अपंग प्रमाणपत्र कोणाकडून बनवून घेतले त्या दलालाचा शोध घेणे देखील आवश्यक आहे.

या दलालाचा शोध घेतला तर अशाच प्रकारे दिव्यांग प्रमाणपत्र किती लोकांना देण्यात आले व हे लोक शासनाच्या योजनेचा लाभ घेत आहेत किंवा नाही हे देखील उघड होईल. या विषयासंदर्भात सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.