अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- कोपरगांवच्या गांधीनगर भागातील सर्वसामान्य कुटूंबातील लेक भाग्यश्री ज्ञानेश्वर वाल्डे हीची बँक ऑफ अमेरिका वॉशिंग्टन डी सी येथे सिनीयर टेक असोसिएट अंडर सॉफटवेअर डेव्हलपर म्हणून निवड झाली त्याबददल तिच्या बुध्दीमत्तेचे कौतुक करावे आहे

तीने यामाध्यमांतून जीवनांत आणखी प्रगती करावी असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले. कुमारी भाग्यश्री वाल्डे हिच्या निवडीबददल तिचा भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते शनिवारी सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी सहकारमहर्षि कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, विनोद राक्षे, दिपक चौधरी आदि उपस्थित होते.

कुमारी भाग्यश्री हिचे दहावी पर्यंतचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या डॉ सी एम मेहता कन्या विद्यालय, त्यानंतर आय टी डिप्लोमा संजीवनी इंजिनियरींग कॉलेज, तर बी टेकचे शिक्षण वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टीटयूट मुंबई येथे झाले. कॅम्पस मुलाखतीतून तिची नुकतीच वार्षीक ३२ लाख रूपये पगारावर निवड झाली आहे.

तिची आई सौ. सोनल ही भाजीपाला विक्रीचा तर वडील ज्ञानेश्वर वाल्डे हे वडापावची गाडी चालवुन परितार्थ चालवितात. कुमारी भाग्यश्री हिची छोटी बहिणही इन्फरमेशन टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत आहे. सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, आज मनुष्य धनाने नव्हे तर ज्ञानाने समृध्द आहे.

कुमारी भाग्यश्री वाल्डे हिने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जे शिक्षण घेतले त्या जोरावर तिची अमेरिकन बँकेत निवड झाली ही कामगिरी आकाशाला गवसणी घालण्यासारखी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीटल कांतीच्या जोरावर भारत देशाला जगात अतिउच्च स्थानावर नेण्याचे काम केले असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीयांचा गौरव जगात वाखाणण्याजोगा आहे असे त्या म्हणाल्या. शेवटी भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी आभार मानले.