बापरे! अहिल्यानगरच्या सीना नदीत केमिकलयुक्त पाणी, हजारो मासे मृत्युमुखी तर नदीपात्रात साचाला मृत माश्यांचा खच, नागरिकांनाही धोका

औद्योगिक व मैलामिश्रित पाणी सीना नदीत मिसळल्याने पाण्याचे तीव्र प्रदूषण झाले. यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले असून नदीलगतच्या गावांतील विहिरीचे पाणीही दूषित झाले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Updated on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहर परिसरात अवकाळी पावसामुळे सीना नदीपात्रात केमिकलयुक्त आणि मैलामिश्रित पाणी वाहून आल्याने नदीचे पाणी दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे पारगाव मौला आणि शिराढोण परिसरातील बंधाऱ्यातील हजारो मासे मृत्युमुखी पडले असून, नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. 

यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शेतीसाठी वापरले जाणारे हे दूषित पाणी शेतकऱ्यांसाठीही हानिकारक ठरत असून, प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिक आणि शेतकरी करत आहेत. महापालिकेची पाणी शुद्धिकरण यंत्रणा अद्याप कार्यान्वित न झाल्याने हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

अवकाळी पावसामुळे मैलामिश्रित आणि केमिकलयुक्त पाणी नदीत

सीना नदी ही नगर शहर आणि आसपासच्या गावांसाठी जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, अवकाळी पावसामुळे शहरातील मैलामिश्रित पाणी आणि औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त पाणी थेट नदीपात्रात मिसळले आहे. यामुळे पारगाव मौला येथील बंधाऱ्यातील पाणी दूषित झाले आहे. या पाण्यातील क्षारांचे प्रमाण 3,800 टीएसपर्यंत पोहोचले आहे, जे सामान्यपणे 350 टीएस असते. इतक्या उच्च क्षारयुक्त पाणी शेतीसाठीही अयोग्य आहे. दूषित पाण्यामुळे नदीच्या पृष्ठभागावर फेस निर्माण होत असून, माशांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे नदीकाठच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे.

शेतीपिकांनाही फटका

या दूषित पाण्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. सीना नदीच्या पाण्याचा वापर शेतीसाठी करणाऱ्या शेतकऱ्यांना आता सुरक्षिततेसाठी गम बूट घालावे लागत आहेत. पाण्यात पाय भिजल्यास त्वचेला तीव्र खाज सुटण्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी नोंदवल्या आहेत. यामुळे शेतीसाठी पाणी वापरणे धोकादायक बनले आहे. बुरुडगाव, वाकोडी, वाळुंज, पारगाव मौला, शिराढोण, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुईछत्तीसी, मठपिंप्री आणि हातवळण या नदीकाठच्या गावांतील विहिरींचे पाणीही दूषित झाले आहे. यामुळे या गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बुऱ्हाणनगर पाणी योजनेवर अवलंबून राहावे लागत आहे.

प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात

महापालिकेची पाणी शुद्धिकरण यंत्रणा अद्याप कार्यान्वित न झाल्याने हा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी महापालिकेने तातडीने पाणी शुद्धिकरण यंत्रणा सुरू करावी आणि शुद्ध पाणी नदीपात्रात सोडावे, अशी मागणी केली आहे. यामुळे भूगर्भातील पाण्याची गुणवत्ता सुधारेल आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!