अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये ढगफुटी झाली आहे. त्यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ होत असल्याने धरणामधून २५ हजार ३९४ क्युसेसने विसर्ग प्रवरा नदीत सोडला आहे. तर घाटघर येथे १९ इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. भंडारदरा धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने निळवंडे धरणामधून प्रवरा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटमध्ये मागील दोन दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू असून अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघरला विक्रमी पाऊस कोसळला आहे. तब्बल ४७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाळ्यातील हा विक्रमी पाऊस समजला जात आहे.
धरणाच्या पाणलोटात गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे भंडारदारा धरणाच्या पाण्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. धरणाच्या पाणी पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भंडारदरा धरणातून २८ हजार २४४ क्युसेसने विसर्ग सोडला आहे. हा विसर्ग सोडल्यामुळे रंधा धबधब्यावर पुर परिस्थिती निर्माण झाली असून पर्यटकांना या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
सदर ठिकाणी राजूर पोलिसांकडून बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात रतनवाडी, घाटघर, पांजरे या ठिकाणी पावसाने चार शतकी मजल मारली आहे. ढगफुटी सारखा पाऊस कोसळत असल्याने आदिवासी बांधवांचे जनजीवन विस्कळीत झाले असून हवेमध्ये प्रचंड गारवा असल्याने बांधवांच्या शेकोट्या पेटल्या आहेत.
तर प्रचंड पावसामध्ये जनावरांना चारावयास नेता न आल्याने जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. २००७ साली अशाच प्रकारे पर्जन्यवृष्टी झाली होती. त्यावेळी भंडारदरा धरण तीन दिवसांमध्ये भरले गेले होते. भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले. गेल्यामुळे निळवंडे धरणाचा पाणीसाठा ७ हजार ४६८ दशलक्ष घनफूट झाला असून निळवंडे धरण ८९ टक्के भरले आहे.
निळवंडे धरणामधूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले असून प्रवरेला महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकोले येथील सेतू पुल पाण्याखाली गेला आहे. भंडारदऱ्याला इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना सुद्धा पर्यटकांनी गर्दी केली होती. प्रचंड पडत असलेल्या पावसामुळे धबधब्यांनी अक्राळ विक्राळ रूप धारण केल्याने पर्यटकांच्या पदरी निराशा पडली, पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी भंडारदरा धरणाच्या सांडव्याजवळ तसेच रंधा धबधबा येथे दिसून आली.
पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गेल्या २४ तासांमध्ये भंडारदरा येथे २४५ मिली मीटर (१० इंच), पांजरे ४४५ मिली मीटर (१८ इंच), रतनवाडी ४४९ मिली मीटर (१८ इंच) तर सर्वात जास्त पावसाची नोंद घाटघर येथे झाली असून तेथे ४७५ मी.मी. (१९ इंच) पाऊस पडला, भंडारदरा धरणाच्या सांडव्यामधून २४ हजार ५६४ क्युसेस तर विजनिर्माण केंद्रातून ८३० क्युसेस, असा एकुण २५ हजार ३९४ क्युसेसने विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडला जात आहे.
कळसुबाई शिखरावर कोसळत असलेल्या पावसामुळे वाकी धरणावरून कृष्णावंती नदी २१९९ क्युसेसने वाहत आहे. निळवंडे धरणाचा पाणीसाठा ७ हजार ४६८ दलघफु झाला असून निळवंडे धरण ९६.२६ टक्के भरले आहे. निळवंडे धरणातून ३० हजार ७७५ क्युसेसने पाणी प्रवरा नदीमध्ये विसर्जित केले जात आहे दोन्ही धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग होत असल्याने धरणांच्या लाभक्षेत्रात प्रवरा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.