सुपारी घेऊन गोर-गरीबांची घरे खाली करणार्‍या महिले विरोधात आरपीआयचे उपोषण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-  जागा खाली करण्याची सुपारी घेऊन एक राजकीय महिला पदाधिकारी पाईपलाईन रोड, समर्थ नगर येथे वास्तव्यास असलेल्या भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबियांना धमकावून राहते घर खाली करण्यासाठी धमकावत असताना त्या महिला पदाधिकारी व जागा मालकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने उपोषण करण्यात आले.

पिडीत कुटुंबीयांना संरक्षण देत त्यांच्या राहत्या घरासमोरच आरपीआयच्या पदाधिकारी व युवकांनी उपोषण केले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, संतोष पाडळे, दिनेश पाडळे आदी उपस्थित होते.

सावेडी, पाईपलाईन रोड, समर्थ नगर येथील एका जागेत राम माने व लक्ष्मण माने अनेक वर्षापासून राहत आहे. मोलमजुरी आणि रखवालीचे काम करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.

काही महिन्यांपासून शहरातील तथाकथित राजकीय पक्षाची पदाधिकारी असलेली गुंड प्रवृत्तीच्या महिलेने ही जागा खाली करुन घेण्याची जागा मालकाकडून सुपारी घेतली असल्याचा आरोप माने कुटुंबीयांनी केला आहे.

राहत्या घरातून माने कुटुंबीयांना बाहेर काढून सदर जागा ताब्यात घेण्यासाठी 15 सप्टेंबर रोजी सदर महिलेने गुंड प्रवृत्तीचे लोक व काही पोलिस आणून सदर जागेची नोटरी केलेली असल्याचे सांगितले. तर घर ताबडतोब खाली करण्यासाठी दमबाजी केली. तसेच जेसीबी लावून घर पाडून टाकण्याच्या धमक्या दिल्या.

याबाबत नीता माने यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. मात्र त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. तक्रारदार महिला गर्भवती असून, तिला व कुटुंबीयांना घर खाली करण्यासाठी वारंवार धमकवले जात आहे. घर खाली करण्यासाठी धमकावणार्‍या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांची कायदेशीर तपासणी करुन

पिडीत कुटुंबीयांना राहत्या घरातून बेघर होण्यापासून वाचविण्यासाठी आरपीआयने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन सदर कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही.

पिडीत कुटुंबीयांना वारंवार जागा खाली करण्यासाठी धमकावण्याचे प्रकार सुरु असून, त्यांना एकप्रकारे संरक्षण देण्यासाठी व सुपारी घेऊन गोर-गरीबांच्या जागा खाली करणार्‍यांवर कारवाई होण्यासाठी उपोषण करण्यात आले असल्याचे आरपीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.