file photo

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :-  नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यात आज ३ हजार २८ कोटींच्या महामार्गाचं भूमीपूजन तर १ हजार 46 कोटींच्या महामार्गाचं लोकार्पण झालं.

या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विखे परिवार एकाच मंचावर उपस्थित होते. शरद पवारांनी यावेळी गडकरी यांच्या कामाचं आणि दूरदृष्टीचं तोंडभरून कौतुक केलं.

तसंच, आपण रस्ते मार्गानं जास्तीत जास्त प्रवास का करतो याचं कारणही पवारांनी आज सांगितलं. नगरमधील महामार्ग भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याला संबोधित करताना ते बोलत होते.

‘रस्ते वाहतूक ही सर्वसामान्यांसाठी महत्वाची असते, त्याला गती देण्याचे काम गडकरी करत आहेत. अन्य राज्यात रस्त्याने प्रवास करताना जेव्हा लोक भेटतात, तेव्हा ते गडकरी यांची कृपा असल्याचं सांगतात.

गडकरी कामं मंजूर करताना राजकारण पाहत नाहीत, मागणी काय आहे ते पाहतात. त्यामुळं सर्व पक्षाच्या लोकांची कामे होतात. इतर कार्यक्रमाला गेलं की वर्षानुवर्षे काही बदल दिसत नाही.

पण गडकरी यांच्या कार्यक्रमाला गेलं की दोन चार दिवसांत फरक दिसतो. एखादा नेता देशाच्या उभारणीत कसं योगदान देतो हे गडकरी यांच्याकडे पाहून लक्षात येतं, अशा शब्दांत पवारांनी गडकरींच्या कामाचं कौतुक केलं.

‘रस्ते, पिके व विकासाची परिस्थिती पाहायला मिळते, त्यामुळं मी शक्यतो रस्त्यानं प्रवास करतो,’ असंही पवार यांनी यावेळी सांगितलं.