चोरीच्या गाड्यांवर खोटी नंबर प्लेट बसून देणे पडले महागात ; चोरीच्या ११ मोटरसायकलसह चौघे जेरबंद

Pragati
Published:

Ahmednagar News : जिल्ह्यातून रोज मोटारसायकल चोरीच्या घटना घडत आहेत. अशा अनेक मोटारसायकल चोरीस गेल्या आहेत मात्र त्यापैकी बोटावर मोजण्याइतक्याच मोटारसायकलचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान राहुरी पोलिसांनी मोटारसायकल चोरटे जेरबंद केले आहेत. त्यांनी मोटारसायकल चोरी करण्याचा अजब फंड पोलिसांसमोर कथन केला.

गेल्या काही दिवसापासून राहुरी शहर व इतर ठिकाणाहून मोटरसायकलीचे प्रमाण वाढले होते. गुन्हे शोध पथक मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेजमार्फत दोन संशयतांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली.

परंतु पोलिसी खाक्या दाखवताच त्या दोघांनी सांगितलेली माहिती अशी, अगोदर मोटारसायकल चोरी केल्यानंतर तिची बनावट नंबर प्लेट लावून तिची कमी किमतीत विक्री करत असे.

या प्रकरणी नावेद इब्राहिम शेख , मंगेश विष्णू ठाकर (दोघे रा. राहुरी) या दोघांना अटक केल्यानंतर त्यांनी चोरलेली गाडी ही किशोर अंकुश पवार ((रा.उंदीर गाव ता- श्रीरामपूर) त्याच्याकडे दिलेली असल्याचे सांगितल्याने त्यालाही अटक केली.

तपासादरम्यान एकूण दोन मोटसायकल जप्त करण्यात आल्या होत्या. तसेच यातील नावेद इब्राहिम शेख याने देवळाली प्रवरा व टाकळीमिया या ठिकाणावरून अजून दोन मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली.

त्यानुसार त्याला न्यायालयाकडून राहुरी पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करून तपास करत असताना आरोपीने सदर गुन्ह्यात चोरलेली मोटरसायकलवर कलर्स रेडियम राहुरी फॅक्टरी येथे जावेद रज्जाक शेख याचे कडून सदर चोरीच्या मोटरसायकलवर बनावट नंबर प्लेट लावून विल्हेवाट लावल्याची कबुली दिल्याने व नंबर प्लेट लावताना सदर गाडी चोरीची असून तीचे कागदपत्राची कुठलीही खातरजमा न करता नंबर प्लेट लावल्याने जावेद रज्जाक शेख यास अटक केली.

नावेद इब्राहिम शेख व जावेद रज्जाक शेख या दोघांनाही न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना ३ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली. पोलीस कस्टडी दरम्यान नावेद इब्राहिम शेख याने अजून नऊ चोरलेल्या मोटरसायकल तपासा दरम्यान काढून दिल्या.

अशा प्रकारे राहुरी पोलिसांनी एकूण ११ मोटरसायकल जप्त करून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील व श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ११ गुन्हे उघडकिस आणले आहेत.

दरम्यान राहुरी पोलिसांनी नंबर प्लेट बनवणाऱ्या व्यावसायिकांना आवाहन केले आहे की, आपल्याकडे कोणताही ग्राहक वाहनावर नंबर प्लेट बसविण्यास आला असता सदर वाहनाचे आरसी बुक, चेसीस नंबर, इंजिन नंबर याची तपासणी करून खात्री करून नंबर प्लेट बसवाव्या.

चोरीच्या मोटरसायकलवर कुणी बनावट नंबर प्लेट बसवत असल्याचा संशय आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. जेणेकरून पुढील धोका टळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe