Ahmednagar News : सध्या शाळा महाविद्यालयातील रोडरोमिओंमुळे शाळा महाविद्यालय प्रशासनासह पालक देखील चांगलेच वैतागले आहेत.महाविद्यालयासह अनेक पर्यटन स्थळी देखील यांचा त्रास वाढला आहे.
रस्त्यावर चालताना मोटारसायकलचा स्टंट करणे, आरडाओरडा गोंधळ असे प्रकार सर्रास घडत आहेत. मात्र संगमनेर तालुक्यात रोडरोमिओंची मस्ती दोन शाळकरी मुलींच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे.

संगमनेर शहरानजिक असलेल्या कासारवाडी गावाच्या परिसरात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या बोगद्यातून जात असणाऱ्या दोन शाळकरी मुलींवर महामार्गावर असलेल्या मोकळ्या जागेतून अज्ञात इसमाने दगड टाकल्याने दोन मुली गंभीररित्या जखमी झाल्या.
त्यामुळे कासारा दुमाला परिसरातील नागरिक चांगलेच संतप्त झाले असून पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आस्था शिवकुमार श्रीवास (मूळ रा.अकोला, विदर्भ हल्ली रा.कासारा दुमाला) तसेच श्रृती गणेश धुमाळ (मूळ रा. जालना, हल्ली, रा. कासारा दुमाला) असे जखमी झालेल्या दोन शाळकरी मुलींची नावे आहेत.
संगमनेर शहरालगत कासारा दुमाला शिवारात श्रीवास आणि धुमाळ हे दोन कुटुंब कामाच्या निमित्ताने अकोला व जालना जिल्ह्यातून आले आहेत. त्यांच्या मुली कासारा दुमाला येथील शाळेत शिक्षण घेत आहेत .
गेली काही दिवसापासून आस्था ही काशेश्वर विद्यालयात आणि श्रृती ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहे. या दोघी शाळकरी मुली शाळेत जात असताना कुणीतरी अज्ञात रोडरोमिओंनी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या बोगद्यातून जाताना मोकळ्या जागेतून दगड टाकल्यामुळे तो दगड श्रीवास या मुलीच्या डोक्यामध्ये पडल्याने ती गंभीररित्या जखमी झाली.
तिला शहरातील शेळके हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, तिच्या डोक्याची जखम मोठी असून तिला सात ते आठ टाके पडले असून श्रृती हिला मुका मार लागला असल्याचे डॉ. दत्तात्रय शेळके यांनी सांगितले आहे.