अहमदनगर बातम्या

वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात अखेर बिबट्या अडकला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- नगर तालुक्यातील भोयरे पठार गावच्या परिसरात पाळीव प्राण्यांवर हल्ले करत धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात अडकला आहे.

दरम्यान याबाबतची माहिती समजताच असून वनविभागाने त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर तालुक्यातील भोयरे पठार व हिवरे बाजार या दोन गावांच्या सिमावर्ती भागात गेल्या ८-१० दिवसांपासून बिबट्याचा वावर होता.

या परिसरात सातत्याने बिबट्या दिसत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले होते. या बिबट्याने काही पाळीव कुत्रे व प्राण्यांवर हल्ला करुन त्यांचा फडशा पाडला होता.

त्यामुळे नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास घाबरत होते. तसेच बिबट्याच्या भितीपोटी शेतकरी शेतात जाण्यास धजावत नव्हते.

त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी बिबट्याचा वावर असलेल्या शेतात ४-५ दिवसांपुर्वी पिंजरा लावला होता. या पिंजर्‍याकडे बिबट्या यावा यासाठी भक्ष म्हणून पिंजर्‍याजवळ शेळी बांधण्यात आली होती.

अखेर बिबट्या भक्षाच्या शोधात पिंजर्‍याजवळ आला व पिंजर्‍यात अलगद जेरबंद झाला. त्यानंतर सकाळी वनविभागाच्या पथकाने सदरचा पिंजरा ताब्यात घेऊन नगरच्या विभागीय कार्यालयात आणला.

Ahmednagarlive24 Office