भरदिवसा घर फोडले अन तब्बल १८ तोळे सोने व रोख रक्कम केली लंपास!

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- अलीकडे जिल्ह्यातील अनेक भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. भरदिवसा घराचा दरवाजा तोडून१८ तोळे सोने व ५० हजार रुपये चोरून नेल्याची घटना नेवासा तालुक्यातील लोहगाव येथे घडली आहे.

याप्रकरणी रंगनाथ दगडू ढेरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, की लोहगाव येथील रंगनाथ दगडू ढेरे हे सकाळी शेतीच्या कामासाठी घर बंद करून पत्नीसह शेतात गेले होते. कामावरून पुन्हा साडेसहा वाजता घरी आल्यानंतर दरवाजा उघडा दिसला.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लोखंडी कपाटातून व शोकेसमधून पाच तोळे वजनाचा सोन्याचा महाराणी हार, चार तोळे वजनाचे गंठण, दीड तोळ्याचे नेकलेस, दीड तोळ्याची सोन्याची चैन,

अकरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, तीन तोळ्याचा लक्ष्मी हार, पाच ग्रॅम वजनाची पिळ्याची अंगठी, पाच ग्रॅम वजनाचे बदाम अंगठी, तीन ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, एक ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, पाच ग्रॅम वजनाची बदाम अंगठी,

चांदीचे पंचपाळे व रोख रक्कम ५० हजार एवढा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

सोनई गावातून १४ जानेवारीला रात्री महावीर पेठेतील लक्ष्मीकांत दायमा यांची दुचाकीची चोरी झाली असून आसपासच्या वाडीवस्तीवरही चोरट्यांनी धुमाकूळ घालत शेतीचे पंप, इलेक्ट्रिक मोटरीची चोरी केली आहे.