अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील तिळापूर शिवारात गेल्या आठ दिवसांपासून अनेक शेतकर्‍यांच्या गायी मृत्यूमुखी पडण्याची घटना घडत आहेत.तर अनेकांच्या गायी ह्या गंभीर आजारी पडल्या आहेत.

तर येथील शेतकरी गोविंद बाचकर 3 गायी, 4 बोकड, संदीप काकड यांची 1 गाय दगावली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या गंभीर समस्येची पशुवैद्यकीय विभागाकडून तात्काळ दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना करुन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा तसेच अनेकांच्या आजारी जनावरांना औषधोपचारासाठी व दगावलेल्या जनावरांना शासन स्तरावर योग्य ती मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

तिळापूर शिवारामध्ये एका विशिष्ट आजाराने गेल्या आठ दिवसांत सुमारे 35 गायींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असताना काल पुन्हा 4 गायी व 4 बोकड या आजाराने दगावले.

ह्या गंभीर आजाराची मालिका सुरुच असल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. सदर घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक दाखल झाले आहे.

डॉ. अमर माने, डॉ. एस.एस.पालवे, डॉ. विजय धिमते, डॉ. एन.एस. मेहत्रे, डॉ.एस.ऐ.निकम, डॉ. डि. बी.निमसे, डॉ. अविनाश ठाकूर यांच्या टिमने प्रत्यक्षात आजावर निदान करीत आहेत व शेतकर्‍यांना योग्य त्या खबरदारीच्या सुचना केल्या जात आहेत.