शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! ‘या’ ठिकाणी कापसाची खरेदी सुरु ; मिळाला ‘इतका’ दर, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Market : सध्या भारत वर्षात कापसाचा हंगाम सुरू आहे. या हंगामात सुरुवातीचा काही कालावधी वगळता कापूस दर दबावात राहिले आहेत. मुहूर्ताच्या कापसाला मात्र 14 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला होता. तदनंतर मात्र दरात घसरण झाली. गेल्या महिन्यात कापूस नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतच्या सरासरी दरात विक्री होत होता.

विशेष म्हणजे कमाल बाजार भाव साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक होता. चालू महिन्यात कापूस दरात घसरण झाली असून सध्या साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजार भाव कापसाला मिळत आहे. अशातच विदर्भातील अकोला जिल्ह्याच्या अकोट एपीएमसीमध्ये कापूस खरेदी बंद झाली होती.

अकोट बाजार समिती ही कापसाच्या लिलावासाठी विदर्भातील एक मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. याच एपीएमसी मध्ये कापसाचे सौदे बंद झाल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. दरम्यान आता अकोट एपीएमसी मध्ये कापूस लिलाव पूर्ववत झाला असून गुरुवारी झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये 550 क्विंटल एवढी कापसाची आवक झाली होती.

सध्या या एपीएमसीमध्ये कापसाला 8300 प्रतिक्विंटल ते आठ हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे. खरं पाहता, बाजार समितीत विक्रीला आलेल्या हलक्या कापसाची सौदापट्टीवर नोंद करण्याच्या कारणामुळे व्यापारी व अकोट एपीएमसी प्रशासन यामध्ये वाद निर्माण झाला होता. यामुळे सहा डिसेंबर पासून कापूस खरेदी थांबली. यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी यामध्ये मध्यस्थी करत गुरुवारपासून लिलाव पूर्ववत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

निश्चितच अकोट एपीएमसी मध्ये पुन्हा एकदा कापसाचीं खरेदी सुरू झाली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. एपीएमसी मध्ये जवळपास नऊ दिवस कापूस खरेदी बंद होते यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी अडचण येत होती. पण आता लिलाव पूर्ववत झाल्याने बाजार समितीत आवक हळूहळू वाढू लागली आहे. आगामी काळात आवकमध्ये अजून वाढ होणार असल्याचे बाजार समिती प्रशासन सांगत आहे.

अशातच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील समोर आली आहे. ती म्हणजे सीसीआय अर्थातच भारतीय कापूस महामंडळाकडून खुल्या बाजारात मिळत असलेल्या दरात कापसाची खरेदी यंदा सुरू करण्यात आली आहे. सी सी आय ने देशात एकूण चार खरेदी केंद्र सुरू केली असून 8400 प्रतिक्विंटल पर्यंतचा दर महामंडळाकडून कापसाला देण्यात आला आहे.

या चार खरेदी केंद्रात दोन खरेदी केंद्र हे महाराष्ट्रातील जालना आणि बीड जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहेत. आगामी काळात सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र वाढवली जाणार असून विदर्भात देखील कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. त्यामुळे निश्चितच येत्या काही दिवसात विदर्भातील कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.