अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. छोटसं का होईना आपलं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. दरम्यान घर घेण्यापूर्वी अनेकांसाठी पहिली पायरी असते ती म्हणजे होम लोन घेणं.

आता गृहकर्ज कुठून घ्यावं असा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर देशातील एक नामांकित कंपनी ही संधी देत आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असणारी लाइफ इन्शोरन्स कॉर्पोरेशनची सहयोगी कंपनी एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनी तुम्हाला स्वस्तात घर खरेदीची संधी देत आहे.

एलआयसी हाऊसिंग फायनान्स आता 6.66 टक्के व्याजाने 2 कोटी रुपयांपर्यंत गृहकर्ज देणार आहे. एलआयसी एचएफएलने यापूर्वी जुलै महिन्यात 50 लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जासाठी 6.66 टक्के व्याजदर दिला होता.

होम फायनान्सरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वाय विश्वनाथ गौड म्हणाले की, 1 जुलै 2021 पासून 50 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावर 6.66 टक्के कर्ज देण्यामध्ये कंपन्या आघाडीवर आहेत आणि आतापर्यंतच्या कर्जासाठी एकसमान दर देऊ केलेत. आता कर्जाची रक्कम 2 कोटी रुपयांपर्यंत वाढवलीय.

व्यवसाय कोणताही असला तरी चालेल :- एलआयसी एचएफएलने एका निवेदनात म्हटले आहे की, हा दर 700 किंवा त्यापेक्षा जास्त CIBIL स्कोअर असलेल्या सर्व कर्जदारांना उपलब्ध आहे, मग त्यांचा व्यवसाय कोणताही असू देत. हा दर 22 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत मंजूर कर्जासाठी आहे. ही विशेष गृहकर्जाची ऑफर 31 डिसेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी प्रथम पेमेंट केली असेल तरच लागू होणार आहे.

प्रक्रिया शुल्क माफ :- एलआयसी हाऊसिंग फायनान्सने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी जास्तीत जास्त 10,000 रुपये किंवा कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के, जे कमी असेल त्यावरील प्रक्रिया शुल्क माफ केले. पेन्शन बेनिफिट स्कीम अंतर्गत कर्जदारांसाठी समाविष्ट गृह विशेष योजनेसह सर्व गृहकर्ज उत्पादनांमध्ये 6.66 टक्के किमान दर उपलब्ध आहे, ज्यात 6 ईएमआयची सूट समाविष्ट आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

 बाकीच्या बँकांमधील काय आहे परिस्थिती?

– कोटक महिंद्रा बँक 6.5 टक्के दराने गृह कर्ज देत आहे. ही एक सणासुदीची ऑफर आहे, जी 8 नोव्हेंबरला संपेल. 75 लाखांच्या कर्जावर 55,918 रुपये ईएमआय भरावा लागेल.

– पंजाब अँड सिंध बँक गृहकर्जाचे व्याज दर 6.65 टक्के आहेत. 75 लाख रुपयांच्या कर्जावर तुम्हाला 20 वर्षांसाठी 56,582 रुपये मासिक ईएमआय भरावा लागेल.

– बँक ऑफ बडोदा 6.75 टक्के दराने गृह कर्ज देत आहे. 75 लाख रुपयांच्या कर्जावर 57,027 रुपये ईएमआय भरावा लागेल.

– दुसरीकडे बजाज फिनसर्व 6.8 टक्के होम लोन देत आहे. 75 लाखांच्या गृहकर्जावर तुम्हाला 57,250 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.