file photo

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- ढगाळ वातावरण, थंडी, पाऊस मध्ये पडणारे कडकडीत ऊन यामुळे सर्दीसह संसर्गजन्य आजार वाढले असून तापाच्या पेशंटमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे डॉक्टर सांगत आहेत. याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे.

गतवर्षीप्रमाणेच यंदाही चांगले पाऊसमान राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. तसा अगदी मे महिन्याच्या अखेरीस पाऊस झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात अल्पावधीतच खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली.

पिकांची उगवणही चांगली झाली. मात्र, त्यानंतर पावसाने लपंडाव सुरू केला. गेल्या पंधरा दिवसांपासून तर हवामानात कमालीचा बदल झाला आहे. काही दिवस दिवसभर उन्हाचा चटका असायचा. रात्री पावसाचे वातावरण व्हायचे. मात्र, पाऊस येत नसे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा हवामानात बदल झाला.

आता सकाळी पावसाची काहीसी भुरभुर असते. दुपारी वेगवान वारा. सायंकाळी बोचरी थंडी, असे विचित्र हवामान सध्या जिल्ह्यात आहे. त्यामुळे नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. थंडीची तीव्रता आणि आता पुन्हा वाढणारे तापमान असे बदल अवघ्या आठवड्यात झाले. वातावरणातील बदलांमुळे शरीराचे तापमान स्थिर राहत नाही.

त्यातून प्रतिकारशक्ती कमी होऊन, विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. त्यामुळे शहरात सध्या थंडी, ताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.” यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.