अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोरोनाशी लढा देत असताना संपूर्ण महसूल यंत्रणा त्यामध्ये सहभागी होती. त्याचबरोबर दैनंदिन महसूल विषयक कामेही सुरु होती.

आता प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे चित्र असल्याने नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी तातडीने मार्गी लागतील यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी महसूल यंत्रणेला दिले.

महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी करतानाच जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या सप्तपदी सूत्रानुसार गावागावातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.

त्यावेळी त्यांनी महसूलविषयक विविध विषयांचा तपशीलवार आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल संबंधित शाखांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, सध्या कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून महसूलसह सर्व यंत्रणा कोरोनाशी लढा देत होत्या. त्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना करीत होत्या. त्याचबरोबर विविध विकास कामे, नागरिकांची महसूलविषयक दैनंदिन जीवनव्यवहाराशी निगडीत कामेही सुरु होती.

मात्र, त्याचा वेग काहीसा कमी झाला होता. आता महसूल यंत्रणांनी या कामांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचे दफ्तर तपासणी करणे, जमीनविषयक नोंदी, प्रलंबित फेरफार नोंदींचे अद्यावतीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रलंबित गौणखनिज प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत.

यासंदर्भातील प्रस्ताव ग्रामसभा ठराव, उपतांत्रिक समिती, तालुकास्तरीय समिती यांच्या नंतर जिल्हास्तरीय समितीकडे पाठविणे आवश्यक आहे. ग्रामसभांनी केलेल्या सकारात्मक अथवा नकारात्मक असा जो अभिप्राय असेल त्यासह सर्वच प्रस्ताव या समितीसमोर येणे अपेक्षित आहे.

त्यादृष्टीने सर्व उपविभागीय अधिकारी यांनी कार्यवाही करावी, असे डॉ. भोसले यांनी सांगितले. या आर्थिक वर्षात जिल्ह्यासाठी दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट्य पूर्ण होईल, याचे नियोजन आणि त्याप्रमाणे कार्यवाही तालुकास्तरीय यंत्रणा आणि संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडून अपेक्षित आहे.

एखाद्या तालुक्यात जरी उद्दिष्ट्यपूर्ती झाली नाही तर त्याचा परिणाम जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टावर होतो. त्यामुळे याप्रकरणी तालुकास्तरीय महसूल यंत्रणांनी आतापासूनच कामाला लागण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या महसूल सप्तपदी अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला.

तालुकास्तरीय यंत्रणांनी आणि गावातील अधिकारी वर्गाने चांगला सहभाग नोंदविल्याने अनेक गावांतील वर्षानुवर्ष प्रलंबित प्रकरणे मार्गी लागू शकली. आता त्याचपद्धतीने हे अभियान पुढे घेऊन जायचे आहे. रस्ते अतिक्रमण मुक्त करणे, प्रत्येक गावात स्मशानभूमीसाठी जागा, पाणंद रस्ते, पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा,

खंडकऱ्यांना जमिनी मिळवून देणे, पोटखराबा असलेल्या जमिनींचे सर्वेक्षण करुन त्या लागवडीखाली येण्यासाठी प्रयत्न करणे आदी कामे या अभियानाच्या माध्यमातून हाती घेण्यात आली. ती कामे तशीच सुरु राहतील.

तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी याबाबत नियमितपणे त्यांच्या स्तरावर आढावा घ्यावा. गावातील लोकांचे प्रश्न गावातच मार्गी लागले तर त्यांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत, यासाठी महसूल यंत्रणेने अधिक सकारात्मकतेने ही प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.