मुंबईत दाखल गुन्ह्यात जामिनावर सुटका झालेले अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयाने नोटीस पाठविली आहे.

जामीन मंजूर करताना घालून दिलेल्या अटींचा भंग केल्याने तुमचा जामीन रद्द का करू नये? अशी नोटीस जारी करण्याचा आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासास्थानासमोर हनुमान चालीसाचे वाचन करण्यासाठी निघालेल्या राणा दम्पत्याला पोलिसांनी अडविले होते.

त्यावरून त्यांच्यात संघर्ष झाला होता.त्यानंतर पोलिसांनी देशद्रोहासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली होती. त्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.

जामिनावर असताना या गुन्ह्यासंबंधी आणि मुख्यमंत्र्यांसंबंधी वादग्रस्त विधाने करून नयेत, यासह अन्य अटी घालण्यात आल्या होत्या. मात्र, सुटका होताच राणा यांनी पुन्हा वादग्रस्त व्यक्तव्य करण्यास सुरवात केली.

त्यामुळे सरकारतर्फे न्यायालयात अहवाल सादर करण्यात येऊन त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यावर न्यायालयाने आता राणा यांच्याकडून स्पष्टीकरण मागविले आहे.