Ahmednagar Breaking : वाहनाचा कट मारल्याच्या रागातून दोघा जणांत झालेले भांडण मिटविणाऱ्या उपसरपंचाच्या कुटुंबाला आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने मारहाण केली. ही घटना डोंगरगण (ता. नगर) येथे २९ एप्रिल रोजी पहाटे घडली.
उपसरपंच गंभीर जखमी असून, जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय बाबासाहेब गोपाळे व जयदीप बाळासाहेब मते यांच्यात वाहनाचा कट मारण्याच्या कारणातून २७ एप्रिल रोजी डोंगरगण फाट्यावर भांडणे झाली होती.
उपसरपंच संतोष भागुजी पटारे (वय ३२, रा. डोंगरगण, ता. नगर) यांनी व इतरांनी मध्यस्थी करून हे भांडण मिटविले होते. पटारे हे २८ एप्रिल रोजी गावातील बसस्थानकावर असताना देविदास आढाव व इतरांनी धमकी दिली होती. पटारे व त्यांचे कुटुंब २९ एप्रिल रोजी घरासमोरील पटांगणात झोपलेले असताना
पहाटे साडेपाचच्या सुमारास अक्षय गोपाळे व इतर तेथे आले. त्यांनी पटारे दाम्पत्याला मारहाण करून जखमी केले. पटारे यांची आई भामबाई यांना देखील मारहाण करण्यात आली. गळ्यातील सोन्याचे दीड तोळ्याचे गंठण, पटारे यांच्या खिशातील १५ हजारांची रक्कम हिसकावून घेतली.
या मारहाणीत पटारे पती-पत्नी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमीच्या जबाबावरून आरोपी अक्षय बाबासाहेब गोपाळे (रा. राहुरी), देविदास बाबासाहेब आढाव,
गौरव देविदास आढाव (दोघे रा. डोंगरगण), विशाल सोनवणे (रा. हिंगणगाव, ता. नगर) व इतर अनोळखी चार ते पाच जणांविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर गावात तणावपूर्वक शांतता होती. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत.