Ahmednagar News : विकलेल्या चारचाकी गाडीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील वादातून एकावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची घटना नेवासा तालुक्यातील टोका शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली तोडमल (रा. नेवासा खुर्द) याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात नुकताच खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली तोडमल (रा. नेवासा खुर्द) याने एक वर्षपूर्वी किशोर दिगंबर आवारे (रा. भायगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्याकडून मारुती सियाज ही गाडी खरेदी केली होती. या गाडीच्या व्यवहारातून माऊली तोडमल व किशोर आवारे यांच्यामध्ये काही दिवसांपासून वादविवाद चालू होते.
दरम्यान रविवारी दि.२ जुन रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास माऊली तोडमल हा भालगावमार्गे नेवासा बुद्रूककडे जात असताना रस्त्यात टोका येथे लघुशंकेला थांबले होते. तेव्हा किशोर दिगंबर आवारे, विठ्ठल दिगंबर आवारे, किशोर हरिश्चंद्रे, गणेश दिनकर कदम (सर्व रा. भायगाव, ता. वैजापूर) व त्यांच्या समवेत अनोळखी तीन ते चारजण दोन वाहनांमधून आले व माऊली तोडमल यास विकलेली मारुती सियाज जबरदस्तीने घेऊन जाऊ लागले.
त्यास माऊली तोडमल याने विरोध केला असता, किशोर आवारे याने त्याच्याकडे असलेल्या गावठी कट्ट्यामधून दोन राउंड फायर केले. गोळीबाराच्या घटनेनंतर माऊली तोडमल याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर नेवासा पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. यावेळी घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर मारुती सियाज कार डिव्हायडरला धडकल्याने सियाज गाडी तेथेच सोडुन ते त्याचेकडील गाडीसह पळुन गेले.
पोलिसांना रस्त्यावरच हि गाडी उभी आढळून आली. यावेळी कारच्या सीटवर एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत राऊंड पोलिसांना मिळून आले आहे. तसेच घटनास्थळी फायर केलेली एक रिकामी पुंगळीदेखील जप्त केली आहे. या गोळीबाराच्या घटनेत माऊली तोडमल यास जखम झालेली आहे. याप्रकरणी दोन संशयीत आरोपी लासूर (ता. वैजापूर) येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.