Ahmenagar News : लाईटचे पोल घेण्याच्या झालेल्या वादातून तुम्ही येथून लाईटचे पोल घेऊ नका, असे म्हणत दोन महिलांना काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून एका मुलीवर थेट कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडली.याप्रकरणी तीन महिलांसह दोघे पुरुष असे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पाचेमहादेव वस्ती येथे शोभा शरद कोकाटे या राहातात. त्यांच्या शेजारीच त्यांचा चुलत दिर गंगाधर बबन कोकाटे हा त्याच्या कुटुंबासोबत राहण्यास आहे. दि.२६ मे २०२४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शोभा कोकाटे यांना लाईट घेण्यासाठी पोल रोवण्याचे काम सुरु होते.
तेव्हा शोभा कोकाटे व त्यांची मुलगी काम करणाऱ्या लोकांसाठी पाणी घेउन जात होत्या. यावेळी तेथे गंगाधर बबन कोकाटे, नवनाथ बबन कोकाटे आले व म्हणाले की, तुम्ही येथुन लाईटचे पोल घेऊ नका, तेव्हा शोभा कोकाटे त्यांना म्हणाल्या की, आम्हाला लाईटची गरज असल्याने आम्ही लाईटचे पोल जोडुन घेणार.
असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी शोभा कोकाटे व त्यांच्या मुलीला शिवीगाळ करुन लाकडी काठी व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याने वार करुन जखमी केले. यावेळी शोभा कोकाटे यांची जाव राजश्री कोकाटे या सोडवासोडव करण्यासाठी आल्या असता त्यांनादेखील शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
घटनेनंतरशोभा शरद कोकाटे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी गंगाधर बबन कोकाटे, नवनाथ बबन कोकाटे व तीन महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.