अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- नगर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगली हजेरी लावली होती. यामुळे धरणे, तलाव तुडुंब भरून वाहिली देखील होती. मात्र अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.(Ahmednagar News)

जिल्ह्यात यंदा विक्रमी पावसानंतर ही ३४१ गावात उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने ऑक्टोबर २०२१ ते जून २०२२ या कालावधीसाठी १४ कोटी ६३ लाख रुपयांचा टंचाई कृती आरखडा तयार केला असून त्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी मान्यता दिली आहे.

दरवर्षी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग हा सप्टेंबर ते जून या कालावधीत जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईचा अंदाज घेवून संभाव्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करत असते.

यंदा देखील जिल्ह्यात मुबलक पावसानंतर ३४१ गावे आणि १ हजार २३१ वाड्या वस्त्यांवर संभाव्य पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात होत आहे.

जिल्ह्यात उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि क्षार युक्त पाणी असणाऱ्या गावातील जनतेची तहान भागविण्यासाठी १४ कोटी ६३ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.