मोठी बातमी! इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंत बदलणार अभ्यासक्रम; गुजराती, उर्दू, सिंधी सह ‘या’ भाषिक विद्यार्थ्यांना मिळणार मराठीचे धडे

Updated on -

Maharashtra School: महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठा बदल होत असून, इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने पूर्णपणे नव्याने तयार केला जाणार आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP 2020) अनुषंगाने 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू होत आहे. विशेष म्हणजे, राज्यातील गुजराती, सिंधी, उर्दू, तमिळ, तेलगू अशा भाषिक विद्यार्थ्यांसाठी मराठीचे धडे आता सोप्या भाषेत आणि आकर्षक पद्धतीने दिले जाणार आहेत.

टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम बदलणार

2025-26 पासून पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून बदलाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 2026-27 मध्ये दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचे पाठ्यपुस्तक बदलेल. 2027-28 मध्ये पाचवी, सातवी, नववी व अकरावीचा अभ्यासक्रम नव्याने तयार केला जाईल. शेवटी 2028-29 मध्ये आठवी, दहावी व बारावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. ही सर्व पाठ्यपुस्तके बालभारतीमार्फत तयार केली जात आहेत.

त्रिभाषा सूत्रामुळे मराठी शिकवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, गैर-मराठी भाषिक पहिलीच्या विद्यार्थ्यांना मराठी सहज समजावी यासाठी ‘बालभारती’कडून ‘मजेत शिकूया’ या नावाचे विशेष मराठी पुस्तक तयार करण्यात आले आहे. हे पुस्तक साध्या शब्दांत, चित्रांच्या साहाय्याने तयार केले गेले आहे. उद्देश हा की मुलांमध्ये मराठीची गोडी निर्माण होईल आणि त्यांची भाषा समजण्याची क्षमता वाढेल.

शिक्षकांसाठी मार्गदर्शिका तयार

यंदा पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांचा भाग समाविष्ट नसेल. ‘खेळू-करू-शिकू’ या पुस्तकाच्या ऐवजी शिक्षकांसाठी हस्तपुस्तिका तयार करण्यात आली आहे. इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ‘खेल खेल मे सिखे हिंदी’ हे पुस्तक उपलब्ध होईल.

‘बालभारती’ने जवळपास 47 लाख पुस्तकांची छपाई पूर्ण केली आहे. ही पुस्तके तालुकास्तरावर पाठवण्यात आली आहेत. इतर भाषिक विद्यार्थ्यांसाठी मराठीची साध्या भाषेतील पुस्तके लवकरच छापून वितरित केली जातील. ‘एसईआरटी’च्या मार्गदर्शनानुसार हे काम सुरू आहे.

शिक्षकांचे प्रशिक्षण 15 जूनपर्यंत

शाळा 16 जूनपासून सुरू होणार आहेत. त्यापूर्वी पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना 15 जूनपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. दररोज 4 तासिकांमध्ये हे प्रशिक्षण दिले जाईल, आणि प्रत्येक तासिका 90 मिनिटांची असेल. अंगणवाडी सेविकांसाठीही 6 महिन्यांपासून ते 1 वर्षाच्या कालावधीचे प्रशिक्षण प्रस्तावित आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News