Ahmednagar News:- सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सात टप्प्यांमध्ये संपूर्ण देशातील निवडणूक पार पडणार आहे तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यातील दुसरा टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार असून शेवटच्या दिवशी आज अनेक ठिकाणी बड्या नेत्यांनी सभांचा धडाका लावलेला आहे. देशातील ही लोकसभेची निवडणूक खूपच रंगतदार पद्धतीने होत असून महाराष्ट्रात तर ही निवडणूक अधिकच रंगतदार होताना दिसून येत आहे.
त्यात महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघांमध्ये तर ही निवडणूक खूपच चुरशीची होणार असून यामध्ये नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदार संघ व अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाकडे अख्ख्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर शिर्डी लोकसभेकरिता महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
परंतु नगर जिल्ह्यातील बरेच आजी-माजी व नवखे नेत्यांचे लक्ष मात्र या लोकसभेच्या निमित्ताने विधानसभेची एक पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून आहे.समोर आलेल्या माहितीनुसार या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत श्रीरामपूरात तर प्रत्येक मोठ्या नेत्याने या निमित्ताने विधानसभेची तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. राज्यामधील जे मोठे नेते आहेत त्यांच्या नजरेत येण्यासाठी ची धडपड यातील अनेक आजी-माजी नेत्यासह नवख्यांची देखील दिसून येत आहे.
लोकसभेच्या आड विधानसभेसाठी प्रयत्न
लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभेची तयारी नगर जिल्ह्यात कशी केली जात आहे हे जर आपल्याला पहायचे असेल तर नुकतेच विद्यमान काँग्रेसचे आमदार लहू कानडे हे काँग्रेसचे प्रमुख नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांनी नुकताच महाविकास आघाडीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत भाऊसाहेब वाकचौरे त्यांच्या पुढाकाराने मेळावा देखील घेतला.
त्यामुळे या मेळाव्यात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती की लग्न वाकचौरे यांचे आहे मात्र सुपारी कानडेंची आहे. त्यांनी विधानसभेची तयारी म्हणून लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसच्या बुथ समित्यांमध्ये शिवसेनेच्या लोकांचा समावेश करून घेण्याचा मनसुबा जाहीर केला आहे व ही जी काही यंत्रणा आता उभी केली जाईल ती पुढच्या विधानसभेला कामी येईल या दृष्टिकोनातून लहू कानडे काम करत आहेत.
त्यामुळे त्यांनी सध्या तरी श्रीरामपूर राहुरी मतदार संघामध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारामध्ये जोमाने कामाला सुरुवात केलेली आहे. तसेच दुसरे उदाहरण हे आपल्याला माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे घेता येईल. सध्या ते बीआरएसमध्ये आहेत.परंतु सध्या त्यांचा प्रयत्न राज्यातील मोठ्या नेत्यांशी मैत्री करण्याच्या दृष्टिकोनातून दिसून येत आहेत. शिंदे सेनेचे मंत्री दादा भुसे यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली.
मुरकुटे हे कार्यकर्त्यांच्या समक्ष सदाशिव लोखंडे अथवा भाऊसाहेब वाकचौरे यांना पाठिंबा जाहीर करतील. या निमित्ताने भानुदास मुरकुटे यांचे हे सगळे प्रयत्न म्हणजेच विधानसभेची तयारीच आहे असे दिसून येत आहे. तसेच तिसरे उदाहरण हे जिल्हा बँकेचे संचालक असलेले करण ससाणे यांचे घेता येईल.
सध्या ते युवक काँग्रेसचे नेते हेमंत ओगलेंशी मैत्री करत असून हा विकास आघाडीच्या वाकचौरे यांच्या माध्यमातून त्यांनी देखील उगलेना जनतेसमोर नेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. येणाऱ्या विधानसभेमध्ये युवक काँग्रेसचे नेते हेमंत ओगले रींगणात असतील हे करण ससाणे यांनी निश्चित केल्याचे दिसून येत आहे.
नगर मधून रिपांइचा देखील तीर विधानसभेकडे
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुती करिता सदाशिव लोखंडे यांच्यासाठी बैठकांचे सत्र सुरू केलेले असून दोन मेळाव्यांचे आयोजन त्यांनी आतापर्यंत केलेले आहे. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा पाठिंबा मिळावा याकरिता त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मुंबईत जाऊन चर्चा करत रिपाईच्या कार्यकर्त्यांना देखील प्रचारात उतरवले आहे.
मात्र या बदल्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने मात्र श्रीरामपूर विधानसभेच्या जागेवर दावा केला आहे. हा राखीव मतदार संघ असल्याने श्रीरामपूर विधानसभेची जागा रिपाइला सोडण्यात येईल असा शब्द विखे पाटील यांच्याकडून घेतल्याचे देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.
एकंदरीत या सगळ्या उदाहरणांवरून आपल्याला दिसून येते की लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विधानसभेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून नेते काम करत आहेत.