Ahmednagar Politics : मतदारांचा रोष वाढला ! भरसभेत लोखंडेंना सवाल, विखेंना विरोध, अजित पवारांवरुन लंकेंनाही घेरले

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी या दोन्ही मतदार संघात सध्या सभा, बैठका, प्रचार फेऱ्या आदी सुरु आहेत. सर्वच उमेदवार सध्या लोकांपर्यंत पोहोचत आपला प्रचार करत आहेत. परंतु आता जसजसा काळ बदलला तसतसे जनताही शहाणी होत चालली असल्याचे चित्र आहे.

याचे कारण असे की या दोन्ही मतदार संघातील उमेदवारांना अनेक ठिकाणी, अनेक गावात जनतेच्या प्रश्नांवरून रोषाला सामोरे जावे लागल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्याचे प्रकार घडले.

यामध्ये मग खा. सुजय विखे असोत, खा. लोखंडे असोत, वाकचौरे व लंके हे देखील यातून सुटलेले दिसत नाहीत. अहमदनगर जिल्ह्यातील जनतेच्या रोषामुळे झालेल्या काही घटना आपण पाहुयात..

लोखंडेच्या बैठकीतच ‘लोखंडे कोण आहेत त्यांचा परिचय करुन द्या’ अशी विचारणा..
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, माजी मंत्री बबनराव घोलप बैठकीस उपस्थित होते.

यावेळी माजी नगरसेवक महेमूद सय्यद यांनी ‘उमेदवार कोण आहेत, ते आम्हाला माहीत नाही. त्यांचा परिचय करून द्या’, अशी मागणी केली. यामुळे गोंधळ उडाला. सय्यद यांना विखेंसह सर्वांनी खाली बसण्याचा सल्ला दिला.

बैठकीनंतर काही कार्यकर्ते सय्यद यांच्यावर धावून गेले. यासंदर्भात शिंदे गटाचे नितीन औताडे यांनी ‘विरोधी उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काही भाड्याचे तदू आमच्या कार्यक्रमात पाठवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला’ असा आरोप केला आहे.

शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला नाही आता केवळ मतांसाठी येता का ?
अहमदनगर मतदारसंघात कर्जत तालुक्यात निमगाव गांगर्डा येथे बुधवारी महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि भाजप आमदार राम शिंदे प्रचारासाठी गेले होते. ‘पाच वर्षात गावात एकही विकासाचे काम केले नाही. शेतमालाच्या हमीभावाबाबत आवाज उठविला नाही. केवळ निवडणुकीत मतदानासाठीच गावाची आठवण येते का, असा सवाल यावेळी ग्रामस्थांनी विखे यांना केला.

वाढता रोष पाहता विखे व शिंदे पुढील दौऱ्यासाठी खाना झाले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा प्रकार विरोधकांनी जाणीवपूर्वक घडवून आणला, असा आरोप विखे यांचे कार्यकर्ते दादा सोनमाळी यांनी केला आहे

भरसभेत शेतकरी संतप्त व उमेदवारांसह समर्थकांची भंबेरी
नगर तालुक्यात देऊळगांवसिद्धी येथे विखे, कर्डीले यांची सभा सुरु असतानाच शेतकरी संतप्त झाला. ‘कोरोना संकट काळात माझी आई आजारी पडल्यानंतर उपचारासाठी मी तुमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क केला, तुम्हालाही फोन केला. तुम्ही फोनच घेतला नाही.

त्यामुळे उपचाराअभावी माझ्या आईचा मृत्यू झाला’ असे सांगत मिठू जाधव यांनी सुजय विखे यांना भर सभेतच विचारणा केली. जाधव बोलत असताना विखे समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांना थांबविले. जाधव हे आपली कैफियत मांडत असताना अनेकांनी त्याचे व्हिडीओ चित्रण केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायलर झाला होता.

अजित पवारांनी राष्ट्रवादी का सोडली? समजावून सांगताना लंकेंच्या नाकी नऊ
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना एका ग्रामस्थाने अजित पवार राष्ट्रवादी सोडून का गेले? असा प्रश्न सभेत केला. नगर तालुक्यातील एका गावात सभा सुरू असताना हा प्रकार घडला.

त्याला उत्तर देताना लंके म्हणाले, मी आधीच सांगितले आहे. सर्वजण टीव्ही पाहतात. सर्वांना सर्व माहिती आहे. तरीही सभेतच उत्तर द्या, असा आग्रह त्या ग्रामस्थाने केला.

त्यावर सभा संपली की तुमच्यासोबत बैठक घेऊन तुम्हाला सांगतो. तसेच तुमचेही मार्गदर्शन घेतो, असे सांगत लंके यांनी त्याला शांत केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe