Farmer Success Story : आपण नेहमी म्हणतो जल हेच जीवन आहे. हे शाश्वत सत्य देखील आहे. मात्र या महागाईच्या युगात अन नोकर कपातीच्या जगात शेती हेच जीवन आहे असं पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे शेतकरी बांधव शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न कमवून ही बाब अधोरेखित करत आहेत. मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या एका उच्चशिक्षित पदवीधर तरुणाने देखील काळ्या आईची मनोभावे सेवा केली तर निश्चितच काळी आई भरभरून देत असते हे सिद्ध करून दाखवले आहे.

जालना तालुक्याच्या अहंकार देऊळगाव शिवारातील माळरानावर पडीक जमिनीत एका उच्चशिक्षित तरुणाने एक अद्भुत यशोगाथा लिहली आहे. योगेश गंडाळ असे या तरुणाचे नाव. या तरुणाने आपल्या दोन एकर शेत जमिनीत सिताफळ या फलोत्पादन पिकाच्या माध्यमातून दोन लाखांची वार्षिक कमाई करून दाखवली आहे. माळरानावर तरुणाने सिताफळ बाग यशस्वी करून घेतलेली लाखो रुपयांची कमाई सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

योगेश खरं पाहता पदवीधर आहेत. त्यांनी बीए पर्यंतचे शिक्षण ग्रहण केले आहे. उच्चशिक्षित असूनही त्यांनी नोकरी ऐवजी शेतीला प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे शेतीत त्यांनी केलेली कामगिरी त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याची ग्वाही देत आहे. पदवीधर योगेशने आपल्या वडिलोपार्जित दोन एकर पडीत शेतजमीनीत सिताफळ बागेची लागवड केली आहे.

चार वर्षांपूर्वी योगेशने या पडीक शेत जमिनीला बागायती करण्याचा निर्णय घेत सिताफळ या शाश्वत पिकाची लागवड केली. त्यांनी बालानगर या सिताफळ जातीची रोपे लावली. या जातीच्या सिताफळ पिकातून त्यांना दरवर्षी अडीच ते तीन लाखांचा नफा मिळत आहे. शेती करताना त्यांना कृषी विज्ञान केंद्राचे अनमोल सहकार्य लाभत आहे. यामुळे त्यांनी अल्पकालावधीत शेतीमध्ये अभूतपूर्व कामगिरी करत लाखोंची कमाई करण्याची किमया साधली आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की योगेश यांनी आपल्या दोन एकर शेत जमिनीत 800 बालानगर या जातीच्या सीताफळांची रोपे लावली आहेत. यावर्षी त्यांना या आठशे रोपांमधून जवळपास 375 कॅरेट सीताफळ उत्पादन झाले आहे. योगेश यांनी उत्पादित केलेल्या सीताफळाला 700 ते 900 रुपये प्रति कॅरेट असा बाजार भाव मिळाला आहे.

यावर्षी योगेश यांना सिताफळ बागेसाठी 40 हजार रुपयांचा खर्च आला असून खर्च वजा करता तीन लाखांच्यावर नफा मिळाला आहे. निश्चितच, जगावर मंदीचे सावट आले असताना आणि सर्वत्र नोकर कपातीचे संकट किंवा मळभ दाटून आले असताना मराठमोळ्या उच्चशिक्षित तरुणाने शेतीमध्ये केलेली ही कामगिरी शेती हेच जीवन आहे,

शेती शिवाय आर्थिक प्रगती अशक्य आहे हे छाती ठोकपणे जगाला ओरडून सांगत आहे. योगेश यांनी केलेला हा प्रयोग पाहण्यासाठी दूरवरून शेतकरी बांधव त्यांच्या बांधावर हजेरी लावत आहेत. निश्चितच त्यामुळे इतर शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.