Farmer Success Story : पश्चिम महाराष्ट्र उसाच्या शेतीसाठी संपूर्ण भारत वर्षात ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर पुणे सांगली सातारा कोल्हापूर नासिक जवळपास सर्वच जिल्ह्यात उसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

आता पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून एका ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचा एक भन्नाट प्रयोग सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या एका ऊस उत्पादक बागायतदाराने योग्य नियोजनाने, कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कष्टाच्या जोरावर उसाचे एकरी 120 मॅट्रिक टन उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.

त्यामुळे सध्या या अवलिया शेतकऱ्याचा प्रयोग नेमका आहे तरी कसा हे जाणून घेण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी बांधवांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे. माढा तालुक्यातील परिते येथील भारत कोंडीबा बाबर यांनी ऊस शेतीमधून एकरी 120 मेट्रिक टन उत्पादन घेऊन दाखवले आहे. भारतराव यांनी ऊसशेतीमध्ये साधलेली ही प्रगती निश्चितच वाखाण्याजोगी आहे.

भारतराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 मार्चमध्ये त्यांनी ऊस शेतीसाठी पहिली नांगरणी केली, यानंतर जूनमध्ये त्यांनी दुसरी नांगरणी केली व शेवटी फळी मारून ऊस लागवडीसाठी वावराची तयारी केली. या नंतर जुलैमध्ये पाच फूट रुंदीची सरी सोडली व रासायनिक खताचा बेसल डोस टाकला, मग २५ जुलै २०२१ रोजी ऊस बेनाची प्रत्यक्षात लागवड करण्यात आली.

ऊस लागवड करण्यासाठी दोन डोळ्याची बेन निवडण्यात आली. उसाचे बेन दीड फुटाचे अंतर सोडून लावण्यात आले. भारतराव यांनी बीजप्रक्रिया केलेल्या कोसी-२६५ वाणाच्या ऊस बेण्याची लागण केली. ऊस लागवड झाल्यानंतर २५ दिवसांनी ड्रीप मधून युरिया सोडला असल्याचे त्यांनी सांगितले. ऊस शेतीसाठी भारतराव यांना ऊस संजीवनीचे कृषीरत्न संजीव माने व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी नारायण लगड यांचं अनमोल मार्गदर्शन लाभला आहे.

या तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाने भारतराव यांनी ऊस लहान होता तोपर्यंत पाठीवरील पंपाने चार फवारण्या केल्या होत्या. यानंतर ऊस उत्पादक शेतकरी भारतराव यांनी ऊस लागवड केल्यापासून ६० दिवसानंतर तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार युरिया, फेरस, झिक, कॉपर सल्फेट, बोरॉन, मॅग्नेशियम ही खते पहारीच्या साह्याने भोके पाडून उसाच्या मुळापर्यंत सोडली. तसेच ऊस १०० दिवसाचा झाल्यानंतर पॉवर ट्रीलरच्या साह्याने उसाची पक्की बांधणी केली असल्याचे भारतराव यांनी नमूद केले. त्यानंतर भारतराव यांनी पिकाला १२:६१ व ०:०:५० ही खते ड्रीप मधून सोडली व नंतर जिवाणू खत सोडले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी सेंद्रिय खतांचा देखील ऊस पिकासाठी उपयोग केला आहे.

भारतराव यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दर पंधरा दिवसाला शेण, गोमूत्र, बेसन पीठ, गूळ व काळी माती यापासून बनवण्यात आलेली स्लरी पिकाला दिली आहे. विशेष म्हणजे ऊस शेतीसाठी भारतराव यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामध्ये ज्यावेळी ऊस मोठा झाला त्यावेळी त्यांनी फवारणी करण्यासाठी कृषी ड्रोनचा वापर केला. निश्चितच महाराष्ट्रातील मराठमोळे शेतकरी आता हायटेक बनले आहेत. याचीच एक झलक भारतराव यांनी दाखवून दिली आहे.

भारतराव यांनी उत्पादित केलेल्या उसाची तोडणी झाली आहे. भारतराव यांना सव्वा एकरात १५०.९८२ मेट्रिक टन उसाचे उत्पादन मिळाले आहे. म्हणजेच एकरी १२० मे. टन उसाचे उत्पादन त्यांनी मिळवून दाखवले आहे. निश्चितच एकरी विक्रमी उत्पादन मिळाले असल्याने भारत रावांची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहे.

भारतराव यांनी ऊस पीकासाठी एकूण ८० हजार रुपये खर्च केला आहे. म्हणजे आता साखर कारखान्याकडून तीन लाख 52 हजार रुपय भारतराव यांना मिळणार आहेत. निश्चितच सव्वा एकरात साडेतीन लाखांची कमाई करून भारतरावांनी इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श रोवला आहे. खर्च वजा जाता भारतरावांना 2 लाख 70 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे.