वाचकहो मैत्री ही एक अशी बाब आहे ज्याला रंग नाही पण जीवनात ती रंगत आणते.  जिला चेहरा नाही तरी ती खूपच सुंदर आहे. 

अशा या सुंदर आणि रंगबेरंगी मैत्रीला आणखी रंगतदार करण्यासाठी येत्या १ ऑगस्टला जगभरात फ्रेंडशिप डे साजरा केला जाईल. आज आपण जाणून घेणार आहोत फ्रेन्डशिप डे विषयी माहिती.(Friendship Day 2021: the history of Friendship Day in marathi) 

मैत्रीचं नातं हे जगातलं सर्वात खास नातं असतं हे कुणालाही वेगळं सांगायची गरज नाही. मैत्रीच्या नात्याशिवाय हे जीवन अपूर्ण आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये. मैत्रीचं हे नातं सेलिब्रेट करण्यासाठी तशी तर एका वेगळ्या दिवसाची गरज नसते.

असा आहे फ्रेन्डशिप डे चा इतिहास

‘फ्रेन्डशिप डे’ साजरा करण्याचा ट्रेन्ड हा तसा इतर डेज प्रमाणे पाश्चिमात्य देशांमध्ये झाला. पण भारतात गेल्या काही वर्षांपासून हा डे तरुणाईमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला. 

ग्रिटींग कार्ड, सोशल मीडिया आणि एसएमएसच्या माध्यमातून लोक एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देतात आणि आयुष्यभर मैत्री निभवण्याचं वचन घेतात.

पण या दिवसाच्या सुरुवातीची कहाणी जगातल्या सर्वात मोठ्या युद्धात दडली आहे…. 

असे म्हटले जाते की, पहिल्या महायुद्धानंतर लोकांमध्ये आणि देशांमध्ये आपसात द्वेष, शत्रुत्व आणि असंतोषाच्या भावना निर्माण झाली. हे संपवण्यासाठी १९३५ मध्ये अमेरिकेच्या सरकारने फ्रेन्डशिप डे ची सुरुवात केली होती.

त्यावेळी हे ठरवण्यात आले की, ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी हा साजरा केला जाणार. त्यामागचं कारण हे आहे की, रविवारी सुट्टी असते आणि लोक एकत्र येऊन हा दिवस साजरा करु शकतात. 

सन १९३० मध्ये एका व्यापाऱ्याने फ्रेंडशिप डे साजरा करण्यास सुरुवात केली. जगभरातील सर्व लोकांप्रमाणे मित्रांसाठी एक खास दिवस असावा, या उद्देशाने या व्यापाराने फ्रेंडशिप डेची संकल्पना राबवण्यास सुरुवात केली.

त्यानंतर युरोप आणि आशिया खंडातील बहुतांश देशांमध्ये ही परंपरेला पुढे नेऊन फ्रेंडशिप डे साजरा केला जाऊ लागला. 

तर, अमेरिकेतील पेराग्वेमधील डॉक्टर रमन आर्टिमियो यांनी २० जुलै १९५८ रोजी एका डिनर पार्टीदरम्यान मित्रांसाठी खास दिवस असावा, अशी घोषणा केली. 

त्यांच्या या घोषणेनंतर फ्रेंडशिप डे साजरा केला जाऊ लागला, असे सांगितले जाते.