अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवरानगर येथे आयोजित करण्यात आलेली सहकार परिषद ही ‘अखिल भारतीय जनता पक्षाची सहकार परिषद’ आहे. अशी टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

तसेच या परिषदेचे आम्हाला निमंत्रण नव्हते जर निमंत्रण असते तर आपण तेथे जरूर गेलो असतो. मल्टीस्टेट विषयी काही सूचना केल्या असत्या.

कोरोना सद्यस्थिती आणि संभाव्य ओमिक्रॉनच्या परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पालकमंत्री मुश्रीफ हे शिर्डी येथूनच नगरमधील बैठकीसाठी आले.

प्रवरानगर येथील कार्यक्रमासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे शिर्डी येथेच आगमन होणार होते. त्यामुळे मंत्री शहा यांची मंत्री मुश्रीफ यांनी भेट घेतल्याची चर्चा होती. पत्रकार परिषदेत बोलताना मुश्रीफ म्हणाले, शिर्डी येथे आपण दाखल झालो त्यावेळी केंद्रीय मंत्री शहा यांचे आगमन झाले नव्हते.

त्यामुळे आपली व केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट झाली नाही. मंत्री शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवरानगर येथे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम म्हणजे अखिल भारतीय जनता पक्षाची सहकार परिषद होय.

सहकार हा राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे. सहकार सुधारणेच्या गोंडस नावे त्यांचा कार्यक्रम सुरु आहे. सहकाराची परिषद असती तर सर्वांनाच बोलवायला हवे होते. सहकार परिषदेचे निमंत्रण आपणास नव्हते. सहकारात काम करताना विश्वस्त भावना व प्रामाणिकपणा असायलाच हवा.

सहकारात काम करताना विश्वस्त भूमिका व प्रामाणिकपणा यास पर्याय नसल्याचे ते म्हणाले. येत्या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पध्दतीने बदल्या करण्यात येणार आहेत. शिक्षकांच्या बदल्यासाठी लवकरच ऑनलाईन सॉफ्टवेअर विकासीत करण्यात येणार असल्याचे देखील ते म्हणाले.