भारतातील वंध्यत्वाच्या समस्येने केले गंभीर स्वरूप धारण

Ahmednagarlive24 office
Published:
Health News

Health News : भारतात वंध्यत्व ही एक गंभीर समस्या दिसून येत आहे. देशभरातील लाखो जोडप्यांवर याचा परिणाम होत आहे. जागतिक पातळीवर वर्षभरात सुमारे ६ ते ८ कोटी जोडप्यांवर वंध्यत्वाचा परिणाम होतो.

भारतामध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. भारतातील सुमारे दीड ते दोन कोटी जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या आहे. याचा अर्थ वंध्यत्वाची समस्या असलेल्या जगभरातील एकूण जोडप्यांपैकी सुमारे पंचवीस टक्के जोडपी भारतात आहेत.

शहरी भागातील जीवनशैली, वातावरणातील प्रदूषण आणि बाळाचे उशिरा होणारे नियोजन यामुळे ग्रामीण भागांच्या तुलनेने शहरी भागात वंध्यत्व असलेल्या जोडप्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.

वंध्यत्वाचे वाढते प्रमाण विचारात घेता यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होते. वंधत्वाचा अडथळा असलेल्या जोडप्यांची वाढती संख्या पाहता, वेळेवर निदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वंध्यत्वाचे निदान लवकर झाले, तर त्या व्यक्तीच्या आवश्यकतेनुसार आणि स्थितीनुसार उपचार करता येतात.

त्याचप्रमाणे सध्याच्या या आव्हानात्मक वातावरणात बाळाचे नियोजन करणाऱ्या जोडप्यांना एक आशेचा किरण मिळतो. परिणामी, वंध्यत्वाशी संबंधित भावनात्मक आणि शारीरिक त्रास कमी करण्यासाठी वेळेवर निदान करून उपचार सुरू करणे आवश्यक असते.

वंध्यत्वाच्या वाढत्या प्रमाणासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अभियानाबद्दल क्लारा आयव्हीएफच्या आयव्हीएफ स्पेशालिस्ट डॉ. चैताली टावरे म्हणाल्या की, वंध्यत्वाच्या वाढत्या प्रमाणासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत.

करिअरमधील महत्त्वाकांक्षेमुळे किंवा आर्थिक स्थैर्य लक्षात घेत विलंबाने करण्यात येणाऱ्या गर्भधारणेमुळे वयाशी संबंधित वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते. आहाराच्या वाईट सवयी, व्यायामाचा अभाव आणि अमली पदार्थांचे सेवन यामुळे ही समस्या अधिकच गंभीर होते.

वातावरणातील घटक म्हणजे प्रदूषण, दूषित घटकांशी संपर्क हेही घटक या समस्येसाठी कारणीभूत असतात. या व्यतिरिक्त, तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे वंध्यत्वाच्या समस्येबद्दल जागरूकता वाढली आहे. त्यामुळे अनेक जण पुढे येऊन या समस्येची वाच्यता करत आहेत.

कोव्हिड-१९च्या उद्रेकानंतर आरोग्यसेवांमध्ये बरीच उलथापालथ झाली. कारण या काळात ताण वाढला होता, वंध्यत्वावरील उपचारांना विलंब झाला आणि ही परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली. लॉकडाऊन आणि आर्थिक अनिश्चिततेने भावनिक तणावात भर घातली आणि आधीपासूनच अस्तित्वात असलेले वंध्यत्वाचे आव्हान अधिक तीव्र झाले.

इन व्हिट्रो फर्टिलायझेशनचा (आयव्हीएफ – कृत्रिम गर्भधारणा) विचार करणाऱ्यांसाठी काळजी घेणे किती आवश्यक आहे, यात वंध्यत्व तज्ज्ञांचा सल्ला घेणे, आरोग्याची तपासणी करणे, ही प्रक्रिया समजून घेणे आणि जीवनशैलीशी निगडित घटक व आर्थिक बाबी लक्षात घेणे, याचा समावेश होतो.

वंध्यत्वाच्या वाढत्या प्रमाणामुळे विविध घटकांचा समावेश असलेली सर्वसमावेशक उपचारपद्धती आवश्यक असते. प्रजनन आरोग्याबद्दल प्रबोधन, आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार, वाजवी खर्चाची हमी आणि वंध्यत्वावरील उपचारांची उपलब्धता,

या व्यतिरिक्त आधुनिक वंध्यत्व उपचारांच्या संशोधनात गुंतवणूक, नव्याने आई-वडील होऊ इच्छिणाऱ्यांसाठी भावनिक व मानसिक आधार, वंध्यत्वावरील उपचार व प्रजनन आरोग्य हक्क समाविष्ट असलेल्या पॉलिसींचा प्रचार आणि वंध्यत्वाच्या आव्हानाला सामोरे जाणाऱ्या व्यक्तींना समुदायाकडून आधार मिळावा व अशा जोडप्यांना साथ मिळावी, यासाठी चालना देणे या घटकांचाही यात समावेश होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe