अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- बहिरोबावाडी (ता.कर्जत) येथील बहिरोबावाडी ते शेळकेवस्ती मार्गे गायकरवाडी फाटा येथे जाणारा कच्चा रस्ता जमिनीच्या वादामुळे तब्बल अडीच वर्षापासुन बंद होता.

मात्र हा रस्ता कर्जतच्या उपक्रमशील पोलिस निरीक्षकांच्या मध्यस्तीमुळे खुला झाल्याने यादव यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.वादात अडकलेल्या या रस्त्याच्या अडचणीमुळे शेतात जाण्यासाठी व आपली माल वाहतूक करण्यासाठी कसरत करावी लागत होती.

या रस्त्यावर बहिरोबावाडी गावच्या हद्दीतील शेळकेवस्ती येथील सुमारे २०० ते २५० नागरिक व विद्यार्थ्यांना बहिरोबावाडीत ये-जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने संपर्क तुटला होता. रस्त्याबाबत दोन्ही गटात सतत वाद होऊन कर्जत पोलीस ठाण्यात तक्रारी प्राप्त होऊ लागल्या.

रस्ता बंद असल्याने व त्यातून सतत वाद होत असल्याने भविष्यात या वादातून आणखी मोठे गुन्हे घडू शकतात याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी वेळेत गांभीर्य ओळखून घेतले. त्यानंतर त्यांनी रस्ता बंद असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतक-यांच्या भेटी घेतल्या.

रस्त्याची आवश्यकता असलेल्या सर्व शेतक-यांच्या व या रस्त्यासाठी जमीन देणा-या शेतमालकांच्या बैठकी घेऊन यशस्वी मध्यस्ती केली.कोणताही वाद न होऊ देता उपेक्षित घटकाला न्याय मिळवून देण्याची चांद्रशेखर यादव यांची हातोटी लपून राहिली नाही.त्यांच्या मध्यस्तीने वर्षानुवर्षे बंद पडलेला रस्ता अखेर खुला झाला.

यादव यांच्या शब्दाखातर या रस्त्यासाठी कैलास दगडू यादव, विठ्ठल साहेबराव यादव, दिलीप महादेव यादव, वसंत भास्कर यादव सर्व (रा.बहिरोबावाडी) यांनी त्यांच्या जमीनीतून रस्ता दिला.त्यांच्या या मोठेपणाचे कौतुक करत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी त्यांचा सत्कार केला.

रस्त्यासाठी असलेला हा संघर्ष आता थांबल्याने आणि शेतकरी, शाळकरी मुलांचा मार्ग मोकळा झाल्याने बहिरोबावाडीतील ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या टिमचाही यथोचित सत्कार केला. बंद पडलेला हा रस्ता खुला करण्यासाठी पोलीस निरीक्षक यादव यांच्यासह कर्जत पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने,

पोलीस अंमलदार सलीम शेख, मनोज लातुरकर, अमित बरडे यांचेसह बहिरोबावाडी गावचे ग्रामस्थ दिपक यादव, वसंत यादव, अनिल यादव, कैलास यादव, सुधिर यादव, राजु यादव, ज्ञानेश्वर यादव, सतिश शेळके, झुंबर शेळके आदींनीही विशेष परीश्रम घेतले आहेत.

इथे होते सगळ्याच प्रश्नांची सोडवणूक! :- पोलिस निरीक्षक यादव हे आपल्या कामामुळे सर्वपरिचित आहेत. त्यांच्या अनेक उपक्रमांमुळे इथल्या सर्वसामान्यांच्या अनेक प्रश्नांची कायमची सोडवणूक होत आहे. ’पोलीस अधिकारी’ या चौकटीत राहून त्यांनी सुरू केलेले अनेक अभिनव उपक्रम शासकीय योजनांनाही लाजवणारे आहेत.