महाभारतातील भीम आणि निर्जला एकादशीचा संबंध काय?, वाचा पौराणिक कथा!

Updated on -

Nirjala Ekadashi 2025: हिंदू धर्मातील उपवासांमध्ये सर्वाधिक कठीण आणि पुण्यदायी मानली जाणारी निर्जला एकादशी 2025 मध्ये 6 जून रोजी म्हणजेच आज साजरी केली जात आहे. ही एकादशी फक्त उपवासापुरती मर्यादित नसून, तिच्याशी संबंधित पौराणिक कथा, आध्यात्मिक महत्त्व आणि अध्यात्मिक ऊर्जा यामुळे ती एक अत्यंत विशेष तिथी मानली जाते. या दिवशी अन्नासोबतच पाण्याचेही सेवन वर्ज्य असल्याने हे व्रत ‘निर्जला’ म्हणजेच ‘पाण्याशिवाय’ असे म्हणतात.

पौराणिक कथा-

या एकादशीचे दुसरे नाव ‘भीमसेनी एकादशी’ देखील आहे, जे महाभारत काळातील महान योद्धा भीमाच्या कथेशी संबंधित आहे. महाभारतात वेदव्यास ऋषींनी पांडवांना एकादशीचे महत्त्व सांगितले होते. त्यावर अर्जुन, युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव यांनी सहजतेने व्रत स्वीकारले, मात्र भीम यासाठी तयार नव्हता, कारण त्याला उपवास करणे अशक्य वाटत होते.

वेदव्यासांनी त्याच्या मनातील द्वंद्व पाहून त्याला एक पर्याय दिला — वर्षातील सर्व एकादशी न पाळता फक्त एक निर्जला एकादशीचे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि नियमाने पाळल्यास त्याला सर्व 24 एकादशींचे पुण्य मिळेल. यामध्ये अन्नासोबतच पाणीही वर्ज्य केले होते. प्रचंड उन्हाळ्यात जेव्हा शरीरास पाण्याची आवश्यकता असते, तेव्हा पाण्याविना उपवास ठेवणे हे अत्यंत कठीण तप मानले जाते.

भीमसेनने वेदव्यासांच्या मार्गदर्शनाखाली हा उपवास पाळला आणि त्याच्या कठीण संयमामुळे ही एकादशी ‘भीमसेनी एकादशी’ म्हणून प्रसिद्ध झाली. या व्रतामुळे भीमला संपूर्ण वर्षाच्या व्रतांचे पुण्य मिळाले. त्यामुळे असे मानले जाते की ज्यांना वर्षभर एकादशी पाळणे शक्य नाही, त्यांनी निदान निर्जला एकादशीचे व्रत तरी करावे.

हे व्रत आत्मशुद्धी, संयम, तपस्या आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. उपवास, मंत्रजप, भगवान विष्णूची पूजा आणि अन्नदानाचे विशेष महत्त्व या दिवशी आहे. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी, फळे, कपडे, पंखे यांचे दान केल्यास ती पुन्यकारक समजली जाते.

व्रत ठेवण्याचे फायदे-

एकाच दिवसात सर्व 24 एकादशींचे पुण्य मिळते. तसेच भूतकाळातील आणि वर्तमान जन्मातील पापांपासून मुक्तता मिळते आणि मोक्षप्राप्ती व भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद लाभतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!