Dharampal Gulati Birth Anniversary : तुम्ही अनेकदा टीव्हीवर मसाल्यांची जाहिरात पहिली असेल. MDH मसाल्यांची जाहिरात अनेकदा टीव्हीवर लागायची आणि सर्वजण जाहिरात लागताच ‘असली मसाले सच सच, एमडीएच… एमडीएच.’ असे म्हणून लागायचे.
या जाहिरातीमध्ये तुम्हाला सतत एक लाल पगडी बांधलेले दादाजी दिसायचे. ते दादाजी म्हणजे MDH मसाल्यांचे संस्थापक होते. MDH मसाले भारतातील सर्व घराघरामध्ये आजही पाहायला मिळतात. भारतात MDH मसाले खूप प्रसिद्ध आहेत.
MDH मसाल्यांचे संस्थापक धर्मपाल गुलाटी हे आज आपल्यात नाहीत पण त्यांची फॅन फॉलोइंग आजही तशीच आहे. आज तुम्हाला MDH मसाल्याच्या संस्थापकांचा थक्क करणारा प्रवास सांगणार आहोत.
फाळणीच्या वेळी दिल्लीत आले
धर्मपाल गुलाटी यांचा १९२३ मध्ये अविभक्त भारतातील सियालकोट येथे जन्म झाला होता. धर्मपाल गुलाटी यांना दादाजी आणि महाशय या नावाने ओळखले जायचे. त्यांनी लहान वयातच शाळा सोडल्याने वडिलांच्या मसाल्यांच्या व्यवसायात ते सहभागी झाले.
धर्मपाल गुलाटी यांनी ५ वी मधूनच शिक्षण सोडले आणि वडिलांसोबत मसाल्यांचा व्यवसाय करू लागले. 1937 मध्ये त्यांनी वडिलांच्या मदतीने छोटे मोठे व्यवसाय करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी वडिलांचा मसाल्यांचा व्यवसाय हाती घेतला.
पण भारताची फाळणी झाल्यानंतर धर्मपाल गुलाटी यांच्याकडून रातोरात त्यांचा व्यवसाय त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आला आणि त्यांना रिकाम्या हाताने भारतामध्ये यावे लागले. ते अवघे 1500 रुपये घेऊन 1947 मध्ये अमृतसरहून दिल्लीला आले.
टांगा चालवून मसाल्यांचे काम सुरू केले
दिल्लीला आल्यानंतर धर्मपाल गुलाटी यांनी १५०० रुपयांपैकी ६५० रुपयांचा एक टांगा विकत घेतला आणि नवी दिल्ली रेल्वे स्टेशन ते कुतुब रोड आणि करोल बाग ते बारा हिंदू राव पर्यंत दोन आणे/राइड्समध्ये चालवायला सुरुवात केली.
काही दिवस त्यांनी टांगा चालवल्यानंतर त्यांनी त्यांचा पारंपरिक मसाल्यांचा व्यवसाय सुरु केला. अजमल खान रोड, करोल बाग, नवी दिल्ली येथे मसाल्यांचा कौटुंबिक व्यवसाय सुरू केला आणि त्याचे नाव ठेवले महाशियां दी हत्ती (MDH). तेव्हापासून त्यांच्या भारतातील मसाल्यांच्या व्यवसायाला सुरुवात झाली.
1959 मध्ये त्यांनी भारतात MDH मसाल्यांना ब्रँड बनण्याचा प्रवास सुरु केला. हळूहळू त्यांनी त्यांच्या व्यवसायात वाढ केली. लोकांचाही त्यांच्या मसाल्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला.
पॅकेजिंगने चमत्कार केले
हळूहळू लोकांना MDH चे मसाले आवडू लागले. त्यामुळे स्थानिक पातळीवर MDH मसाल्यांना प्रसिद्धी मिळत गेली आणि व्यवसायात वाढ होत गेली. 1953 मध्ये त्यांनी दुसरे दुकान उघडले. 1959 मध्ये, त्यांनी पावडर मसाल्यांच्या उत्पादनासाठी कारखाना सुरू करण्यासाठी कीर्ती नगर, दिल्ली येथे एक भूखंड खरेदी केला.
MDH मसाल्यांच्या नाविन्यपूर्ण पॅकेजिंगने लोकांची माने जिंकली आणि लोकांचा मोठा प्रतिसाद या मसाल्यांना मिळू लागला. तसेच हळूहळू भारतामध्ये MDH मसाल्यांची ओळख वाढत गेली.
करोडोंचा व्यवसाय उभा केला
आता सध्या धर्मपाल गुलाटी यांची MDH कंपनी तब्बल ६५ उत्पादने विकत आहे. आता MDH मसाल्यांचे भारतमध्ये १००० डीलर आहेत. 2019-20 या आर्थिक वर्षात कंपनीने परिचालन उत्पन्न म्हणून सुमारे 2,000 कोटी रुपये आणि त्यातील निव्वळ उत्पन्न म्हणून 420 कोटी रुपये कमावले आहेत.
धर्मपाल यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी ३ डिसेंबर २०२० रोजी निधन झाले. मृत्यूपूर्वी, म्हातारपणातही ते नियमितपणे त्यांच्या कारखान्यांना भेट देऊन कामाची पाहणी करत होते.