Categories: भारत

मोदी ‘अदानी-अंबानी’चे लाऊडस्पीकर…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नूंह (हरियाणा) : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपती अदानी व अंबानींचे लाऊडस्पीकर आहेत. त्यांनी नेहमीच आपल्या श्रीमंत उद्योगपती मित्रांना फायदा पोहोचविण्याचे काम केले’, अशी तिखट टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केंद्र सरकारवर निशाणा साधताना केली.

राहुल गांधी यांनी सोमवारी हरियाणाच्या नूंह येथील एका प्रचारसभेला संबोधित केले. त्यात त्यांनी अर्थव्यवस्था व बेरोजगारीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ‘अर्थव्यवस्था व बेरोजगारीची स्थिती अशीच कायम राहिली तर येत्या काही महिन्यांत अवघा देश मोदींच्या विरोधात उभा ठाकलेला दिसेल’, असे ते म्हणाले. ‘नरेंद्र मोदी अदानी व अंबानी यांचे लाऊडस्पीकर आहेत. ते दिवसभर त्यांचीच भाषा बोलतात. तुम्ही तरुणांना मूर्ख बनवून सरकार चालवू शकत नाही. एक दिवस खरी वस्तुस्थिती पुढे येईल. तद्नंतर काय होईल हे सर्वजण पाहतील’, असे राहुल म्हणाले.

‘सद्यस्थितीत दररोज खोटी आश्वासने ऐकावयास मिळत आहेत. त्यांनी २ कोटी रोजगार देऊ, शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊ, अशी अनेक आश्वासने दिली. पण, प्रत्यक्षात काहीच झाले नाही. कोट्यवधी तरुण बेरोजगार झाले आहेत. पण, मोदी व मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सातत्याने खोटे बोलत आहेत’, असेही ते यावेळी म्हणाले.

भाजप नागरिकांना झुंजवण्याचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. विशेषत: राफेल सौद्यावरून त्यांनी माध्यमांना धारेवर धरले. ‘देशात सर्वत्र बेरोजगारी आहे. पण, माध्यमे तुम्हाला बॉलिवूड व चंद्र दाखवत आहेत. ते तुम्हाला राफेलची पूजाअर्चा दाखवतील. पण, त्यात झालेली चोरी दाखवणार नाहीत’, असे राहुल म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24