Kishori Pednekar : राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार टीकासत्र सुरु आहे. शिंदे गटातील नेत्यांनी ठाकरे गटामध्ये आणखी फूट पडणार असल्याचा दावा केला आहे. तर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटातील आमदारांनी खोके घेतल्याचा पुरावा आमच्याकडे असल्याचा दावा केला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे गटाच्या आमदारांवर खोक्यांचा आरोप केला जात आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांकडून हे आरोप कोर्टात सिद्ध करण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, विधानसभेत जेव्हा मोठ्या प्रमाणात बोंबाबोंब झाली. आरोपांच्या फैरी झडू लागल्या. त्यावेळेला शंभूराज देसाईंनी सांगितलं हो मिळाले, तुम्हाला हवेत का? असं विचारल्यानंतर पुष्टी मिळते, पुष्टी मिळाल्यामुळे लोकं म्हणत असतील.

ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार रात्री अपरात्री मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेत आहेत असा दावा शिंदे गटातील नेत्यांकडून करण्यात येत आहेत यावरही किशोरी पेडणेकर यांनी संवाद साधला आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आमदार-खासदार भेटत असतील. उद्धव ठाकरे यांनी तर 19 जूनलाच सांगितलंय ज्यांना जायचंय त्यांनी जा, आईचं दूध विकू नका.. याचा अर्थ आताही कुणी जाणार असतील कुणी थांबवणार नाही असंही पेडणेकर म्हणाल्या.

किशोरी पेडणेकर यांनी शिवतारे यांनाही इशारा दिला आहे, मा. शिवतारे यांना मी सांगते, लोकशाहीचा स्तंभ म्हणून तुम्ही कोर्टात गेलात आणि प्रत्येकावरती केसेस करायला लागलात तर हे पुरावे आहेत, हे विसरू नका.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरत खालच्या पातळीत टीका केली होती. त्यावरही किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केले आहे.

सुप्रिया सुळेंबद्दल एवढं घाणेरडं वक्तव्य होते, तेव्हा त्यांना तुम्ही पाठिशी घालता का? उत्कृष्ट संसदपटू म्हणून सुप्रिया सुळेंचे कौतुक होते. त्यांना असे तुम्ही म्हणता हे लांच्छनास्पद असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे.