Ahilyanagar News : अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

Published on -

Ahilyanagar News : श्रीगोंदा परिसरातील शेतकऱ्यांसाठी कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचा न्याय्य वाटप सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा सक्रिय भूमिका घेतली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २० जूनपूर्वी डिंभे-माणिकडोह बोगदा आणि आंबेगाव तालुक्यातील चार उपसा सिंचन योजना यांचा समावेश असलेला सुमारे हजार कोटींचा सुधारित विकास आराखडा राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रकल्प अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

कुकडी प्रकल्पाचा इतिहास आणि विकास प्रवास

कुकडी प्रकल्पाची सुरुवात १९५६ मध्ये राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ३१ कोटी रुपयांच्या आराखड्याने झाली होती. नंतर १९७६ मध्ये १२३ कोटी आणि १९८९ मध्ये ६९२ कोटींचा सुधारित विकास आराखडा तयार केला गेला. २०१६ मध्ये तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून सर्वाधिक म्हणजे ३,९४८ कोटींचा तिसरा विकास आराखडा सादर झाला, ज्यामुळे कुकडी प्रकल्पाचा विस्तार आणि गती मिळाली.

डिंभे-माणिकडोह बोगद्याचे वैशिष्ट्ये

डिंभे-माणिकडोह बोगद्याची लांबी सुमारे १६ किलोमीटर असून, त्याचा आकार ३.८×३.८ मीटर चौरस आहे. बोगद्याचा तळ उतार १.२ मीटर असून, वहन क्षमता ३९.९८ घनमीटर प्रति सेकंद आहे. प्रस्तावित पाण्याची गती ३ मीटर प्रति सेकंद आहे, तर संपूर्ण बोगद्याचा उतार ३४ मीटर आहे. अंदाजे ५५० कोटींच्या या प्रकल्पामुळे डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यावरील क्षारयुक्त क्षेत्र कमी होण्यास मदत होईल, येडगाव धरणाच्या डाव्या कालव्यावर पाण्याचा आवर्तन वाढेल आणि घोड धरणात देवदैठण येथून पाणी सोडता येईल. यामुळे माणिकडोह धरणातील पाण्याची तूट कमी होईल आणि पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्यांतील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळेल.

का आहे बोगद्याची गरज

कुकडी प्रकल्पात येडगाव धरणावर डाव्या कालव्याची लांबी २४९ किलोमीटर आहे, ज्याअंतर्गत पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये लाखो हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येते. या प्रकल्पातील एकूण ३०.८५६ टीएमसी पाण्यापैकी फक्त २१ टीएमसीची तरतूद केली आहे, परंतु डिंभे धरणातून ६.२१ टीएमसी पाणी येडगाव धरणात पोहोचत नाही. तसेच, १०.५ टीएमसी क्षमतेचे धरणही पूर्ण क्षमतेने भरत नाही. या अडचणींवर मात करण्यासाठी डिंभे-माणिकडोह बोगद्याचा पर्याय पुढे आला आहे.

राजकीय पराभवातून निर्णय ?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यात मताधिक्य घट झाल्याने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर गंभीर विचार केला. त्यानुसार घोड धरणावरून साकळाई योजना राबविण्याचा निर्धार केला गेला, तर डिंभे-माणिकडोह बोगदा प्रकल्प हाती घेतला गेला. या प्रकल्पाला ६०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे, तर चार उपसा सिंचन योजनेसाठी प्रत्येकी १०० कोटी रुपये राखीव ठेवले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News