Farmer Success Story : पारंपारिक शेतीला फाटा देत सुरु केली सीताफळ शेती !; 3 एकरात चार लाखांची कमाई करत बनला लखपती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : पारंपारिक पिकपद्धतीला बगल दिली आणि शेतीत नगदी तसेच फळबाग पिकांची शेती सुरू केली तर निश्चितच शेतीतून लाखोंची कमाई केली जाऊ शकते. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या मौजे मलकापूर येथील एका प्रगत शेतकऱ्यान देखील शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करत सीताफळ शेतीतून अवघ्या तीन एकरात चार लाखाची कमाई करण्याची किमया साधली आहे.

यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा पाहायला मिळत आहे. सुखदेव बाळा वाघमारे असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी आपल्या तीन एकर शेत जमिनीवर सिताफळ लागवड केली आहे. लागवड केल्यानंतर जवळपास चार वर्षांनी त्यांना आता यातून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे.

खरं पाहता सुखदेव यांच्याकडे एकूण आठ एकर शेत जमीन आहे आणि ते आधी इतर शेतकऱ्यांप्रमाणेचं सोयाबीन आणि कापूस या पारंपारिक पिकांची शेती करत असत. परंतु परिसरात मजूरटंचाई प्रकर्षाने जाणवत असल्याने तसेच पारंपारिक पिकांसाठी आवश्यक बी बियाण्यांचा, खतांचा, कीटकनाशकांचा आणि औषधांचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली.

तसेच उत्पादन मोठे कमी मिळत असे. यामुळे उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी स्थिती होती. परिणामी त्यांनी फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला. मग काय 2018 साली आपल्या तीन एकर शेत जमिनीत सिताफळाची शेती सुरू केली. तीन एकर जमिनीत जवळपास एक हजार रोपांची लागवड करण्यात आली. आता चार वर्षे झाले असून यातून उत्पादन मिळायला सुरुवात झाली आहे.

पहिल्याच वर्षी नऊ टन एवढा उत्पादन मिळाल असून चार लाखांची कमाई झाली आहे. विशेष म्हणजे सिताफळ बाग जोपासण्यासाठी त्यांना अवघा 50 हजाराचा खर्च आला, अशा पद्धतीने त्यांना तीन एकरातून साडेतीन लाखांचा निव्वळ नफा मिळाला. सुखदेव यांना आपल्या संपूर्ण परिवाराने मोठी मोलाची साथ दिली असून एकजुटीचाच परिणाम म्हणून त्यांना हे घवघवीत यश मिळाले आहे.

निश्चितच वाघमारे कुटुंबाने इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श घालून दिला आहे. जर योग्य नियोजन आखलं तर कमी शेत जमिनीतून देखील लाखोंची कमाई केली जाऊ शकते हेच आपल्याला वाघमारे यांच्या उदाहरणावरून पाहायला मिळते.