खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रात कपाशी आणि सोयाबीन या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते व त्या खालोखाल लागवड होणाऱ्या पिकांची यादी पाहिली तर यामध्ये कडधान्य वर्गीय पिकांमध्ये तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तूर या पिकाची लागवड आंतरपीक म्हणून मुख्य पिकात बरेच शेतकरी करतात तर काही शेतकरी मुख्य पीक म्हणून तूर लागवड देखील करतात.
जर आपण मागच्या वर्षी पासून तर आतापर्यंत असलेले तुरीचे बाजार भाव पाहिले तर ते चांगले असून शेतकऱ्यांना तूर पिकातून चांगला आर्थिक नफा मिळालेले आहे. आता खरीप हंगामाची सुरुवात होत असल्याने बरेच शेतकरी तूर लागवड करण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करतील व दर्जेदार तसेच उत्पादनक्षम असलेल्या तूर व्हरायटीची निवड करण्याला प्राधान्य देतात.
कारण कुठल्याही पिकाचे बियाणे जर चांगले उत्पादनक्षम व दर्जेदार असेल तर त्यापासून उत्पादन देखील चांगले मिळते व हाच मुद्दा तुर पिकाला देखील लागू होतो. त्यामुळे जर यावर्षी तुमचा देखील तूर लागवड करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्याकरिता महत्त्वाच्या नवीन तुर वाणा बद्दलची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाची फुले पल्लवी ही तुरीची व्हरायटी देईल चांगले उत्पादन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कडधान्य सुधार प्रकल्पाने विकसित केलेला फुले पल्लवी हा नवीन तुर वाण अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य, कानपूर यांच्या माध्यमातून मान्य करण्यात आला आहे. तुरीच्या या व्हरायटीची शिफारस महाराष्ट्र, मध्यप्रदेश तसेच छत्तीसगड, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये लागवडीकरिता करण्यात आलेली आहे.
फुले पल्लवी तूर वाणाची वैशिष्ट्ये
1- जर आपण फुले पल्लवी या तुरीच्या व्हरायटीची सरासरी हेक्टरी उत्पादकता पहिली तर ती साधारणपणे 21 क्विंटलच्या पुढे आहे.
2- फुले पल्लवी या व्हरायटीचे तुरीचे दाणे ही फिक्कट तपकिरी रंगाची असतात व टपोरी असतात. साधारणपणे शंभर तुरीच्या दाण्यांचे वजन 11.0 ग्रॅम आहे.
3- महत्त्वाचे म्हणजे तूर पिकावर येणाऱ्या वांझ आणि मर या प्रमुख रोगांना फुले पल्लवी व्हरायटी मध्यम प्रतिकारक आहे.
4- एवढेच नाही तर शेंगमाशी आणि शेंग पोखरणारी अळी सारख्या नुकसानदायक किडींपासून देखील या व्हरायटीचे कमीत कमी नुकसान होते.
त्यामुळे आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या फुले पल्लवी या नवीन तूर व्हरायटी मुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ होईल व त्या माध्यमातून चांगला पैसा मिळेल अशी एक अपेक्षा आहे. तसेच रोग आणि किडींपासून होणारे नुकसान व त्यावर नियंत्रणासाठी येणारा खर्च यामध्ये देखील बचत होईल.