बळीराजाचा तळतळाट ! नुकसान 38 हजाराचं भरपाई 15 रुपयाची ; आरं कुठं फेडणार ह्यो पाप? शेतकऱ्यांचा लागेल शाप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima : यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. खरीप हंगामातील सोयाबीन समवेतचं जवळपास सर्वच पिकांना मोठा फटका बसला. जळगाव जिल्ह्यातही अशीच परिस्थिती होती. यामुळे खरीप हंगामातील पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना निदान आता पिक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळेल आणि पिकासाठी झालेला खर्च तरी निघेल अशी आशा होती.

मात्र पिक विमा कंपन्यांकडून अक्षरशा शेतकऱ्यांना भिकेसमान भरपाई मिळत आहे. हजारो रुपयांचे नुकसान झालेले असतांना काही शेतकऱ्यांना 15 रुपये, काहींना 500 ते 700 रुपयांची नाममात्र भरपाई मिळाली आहे. यामुळे पीक विमा कंपनी भरपाई देत आहे की जखमेवर मीठ चोळत आहे हेच समजत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जिल्ह्याच्या पिंप्राळा महसूल मंडळातील दत्तात्रेय तुळशीराम पाटील या सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवाला नुकसान भरपाई पोटी मात्र पंधरा रुपये मिळाले आहेत. म्हणजे हेक्टरी 38 हजार रुपये एवढी नुकसान भरपाईची रक्कम असताना दत्तात्रेय यांना अवघी पंधरा रुपये नुकसान भरपाई मिळाली असल्याने शेतकऱ्यांची ही क्रूर चेष्टा केली जात असल्याचा आरोप होत आहे.

विशेष म्हणजे केवळ दत्तात्रेय यांनाच कवडीमोल नुकसान भरपाई मिळाली असे नाही तर अरुण पाटील या शेतकऱ्याला मात्र 675 तर सुरेश नेरकर यांना मात्र 540 रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. विशेष म्हणजे पिंप्राळा महसूल मंडळात केवळ या तीन-चार शेतकऱ्यांना कमी नुकसान भरपाई मिळाली असं नाही तर संपूर्ण महसूल मंडळात 38 हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला नुकसान भरपाई असतांना शेतकऱ्यांना सरासरी दोन ते तीन हजार रुपये नुकसान भरपाई पिक विमा कंपन्यांकडून देऊ करण्यात आली आहे.

यामुळे शेतकऱ्यांनी याप्रकरणी लोकप्रतिनिधींना तसेच कृषी विभागाला जातीने लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे. निश्चितच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. पिंपराळा महसूल मंडळातील पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत संबंधित पिक विमा कंपनीला माहिती दिली.

त्या अनुषंगाने नुकसानीचे पंचनामे झाले आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मंडळातील नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान दाखवल्यानंतरही शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल नुकसान भरपाई मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कृषी विभागाविरोधात तसेच कंपनीविरोधात रोष वाढत आहे.