नांदखुळा कार्यक्रम ! मराठमोळ्या शेतकऱ्याने दोन एकर खडकाळ जमिनीवर फुलवली डाळिंब बाग ; मिळवलं लाखोंच उत्पन्न ; पंचक्रोशीत रंगली चर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pomegranate Farming : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवडीवर अधिक जोर दिला आहे. विशेष म्हणजे फळबागेतून त्यांना चांगली कमाई देखील होत आहे. जाणकार लोक देखील शेतीतून अधिक उत्पन्न प्राप्तीसाठी फळपीक शेती करण्याचा सल्ला देतात.

आपल्या राज्यात डाळिंब या फळाची सर्वाधिक लागवड पाहायला मिळते. याच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होते. विशेष म्हणजे खडकाळ जमिनीवर देखील डाळिंबाचे यशस्वी उत्पादन घेतले जाऊ शकते. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या मौजे खडकी येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील हे सिद्ध करून दाखवल आहे.

 गणेश रावसाहेब वानखेडे असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी खडकाळ माळरानावर डाळिंब बाग फुलवून त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून आपल्या सव्वा एकर शेत जमिनीवर मोसंबीची देखील लागवड केली आहे.

गणेश यांची शेती ही खडकाळ माळरानावरची, त्यातल्या त्यात शेतीसाठी पाण्याची सोय देखील नव्हती. साहजिकच पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने पारंपारिक पिकातून त्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नव्हतं. मग काय त्यांनी पारंपारिक शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीने फ़ळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला.

या अनुषंगाने त्यांनी आपल्या दोन एकर खडकाळ माळरानावर 525 डाळिंबाची रोपे लावली. बारा बाय बारा अंतरावर डाळिंबाची रोपे लावण्यात आली. डाळिंब पिकाला कमी पाणी लागते यामुळे त्यांनी या पिकाला प्राधान्य दिले आणि पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन प्रणाली बसवली.

विशेष म्हणजे डाळिंब लागवड केल्यानंतर त्यात आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला यामुळे डाळिंब जोपसण्यासाठी लागणारा खर्च आंतरपिकातून मिळाला. पुढे त्यांनी शासकीय अनुदानाचा लाभ घेत शेततळ्याची निर्मिती केली. दोन किलोमीटर अंतरावर शेततळे असल्याने तेथून पाईपलाईनच्या मदतीने पाणी आणण्यात आले.

पाण्याचा ताण मिटला. डाळिंब बागेचे योग्य व्यवस्थापन केले. तिसऱ्या वर्षी डाळिंबाचा बहर धरला आणि यातून त्यांना तब्बल साडेतीन लाखांची कमाई झाली. निश्चितच दोन एकरात लाखों रुपयांची कमाई झाली यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी सव्वा एकर शेत जमिनीवर मोसंबीची 300 झाडे लावली. आता त्यांना डाळिंब प्रमाणेच मोसंबी शेती देखील यशस्वी करायचीं आहे.

यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत असून या कामी त्यांच्या परिवाराचा त्यांना मोठा पाठिंबा लाभत आहे. निश्चितच जर योग्य व्यवस्थापन केले तर कमी शेत जमिनीतून देखील लाखोंचे उत्पन्न कमावले जाऊ शकते हेच गणेश वानखेडे यांनी दाखवून दिले आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याचा हा प्रयोग निश्चितच इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.