बाजारात मेथीची जुडी खातेय भाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : राज्यात पावसाने ओढ दिल्याने वातावरणात उष्मा वाढला आहे, तर अधूनमधून हलक्या सरी बरसतात. मात्र हवामानातील या बदलाने मेथीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे एपीएमसीत मेथीची आवक घटली असून दरात वाढ झाली आहे. परिणामी, किरकोळ बाजारात गृहिणींना मेथीच्या एका जुडीसाठी चक्क पन्नास रुपये मोजावे लागत आहेत.

श्रावण महिन्यात जास्त शाकाहार होत असल्याने भाज्यांची मागणी अधिक असून त्यातही पालेभाज्यांची अधिक मागणी असते. मात्र वातावरणातील बदलामुळे मेथीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात अवघी ५० टक्केच आवक होत आहे. एपीएमसी बाजारात पुणे आणि नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या दाखल होत असतात. मात्र सध्या बाजारात लातूर, उस्मानाबाद आणि कर्नाटक येथून देखील पालेभाज्या दाखल होत आहेत.

पुणे आणि नाशिक येथील मेथी अगदी कमी प्रमाणात आहे. बुधवारी एपीएमसीत मेथीच्या ९ गाड्या दाखल झाल्या असून २ लाख ९० हजार क्विंटल आवक झाली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत बाजारात आवक कमी असल्याने घाऊकमध्ये दरात वाढ झाली असून प्रतिजुडी १८-२५ रुपयांनी विक्री होत आहे. तेच किरकोळ बाजारात मात्र मेथी ४० ते ५० अशी दुप्पट दराने विक्री होत आहे.

हवामान बदलाने मेथीच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे एपीएमसी भाजीपाला बाजारात मेथीची अवघी ५० टक्के आवक होत आहे. परिणामी, मेथीच्या घाऊक दरात वाढ झाली असून प्रतिजुड़ी २०-२५ रुपयांनी विक्री होत आहे. – भारत घुले, व्यापारी, एपीएमसी

आजच्या स्थितीत

शाकाहार करणे महाग झाले आहे. आधी टोमॅटोने कंबरडे मोडले होते. त्याचे दर खाली उतरत नाही तोवर मेथीचे दरदेखील ५० वर गेल्याने भाज्या शिजवायच्या तरी कशा? -जयश्री चौधरी, गृहिणी