अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथे अवैध वाळूउपसा करणाऱ्या वाहनावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

या ट्रकवर जिल्हा गौण खनिज पथकाने कारवाई केली. पकडलेला ट्रक नदीपात्रात खचल्याने श्रीगोंदे महसूल विभाग व पोलिसांच्या ताब्यात दिला. परंतु वाळूतस्कराने गाडीत बसलेल्या तलाठी व होमगार्डला शिवीगाळी, दमदाटी, धक्काबुक्की, मारहाण करुन पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर हायवा घालून पळवून नेला.

या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात तलाठ्याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला नदीपात्र मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची माहिती जिल्हा गौण खनिज पथकातील नायब तहसीलदारांना मिळाली. त्यांनी भर दुपारी तालुक्यातअजनुज येथे छापा मारत अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा क्र. एमएच ४२ एक्यू ८८८३ हा ४ ब्रास वाळूसह ताब्यात घेतला.

हायवा कारवाईकरिता श्रीगोंदे तहसील कार्यालयात आणताना तो नदी पत्रात खचला. तलाठी सचिन प्रभाकर बळी, पोलिस कर्मचारी राजेंद्र भोर, होमगार्ड अक्षय काळे यांच्या ताब्यात दिला. चालक अक्षय सुनील डाळिंबे तसेच हायवा मालक यांनी तलाठी व होमगार्ड यांना शिवीगाळी दमदाटी केली.

धक्काबुक्की मारहाण करुन हायवा गाडीमधून खाली उतरण्यास भाग पाडले. वाळूने भरलेली हायवा ट्रक पोलिस कर्मचारी भोर यांच्या अंगावर घालत पसार झाले.

तलाठी सचिन प्रभाकर बळी यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिस ठाण्यात ड्रायव्हर अक्षय सुनिल डाळिंबे, हायवा मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर हे करत आहेत.