Breaking news. World news with map backgorund. Breaking news TV concept. Vector stock.

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर शहर सहकारी बँकेतील बोगस कर्जप्रकरणी एक नवीनच ट्विस्ट समोर आला आहे. या बोगस कर्जप्रकरणी दोन डॉक्टरांच्या पत्नींनी व एका डॉक्टरने फिर्याद दिली होती.

मात्र, आता या गुन्ह्यात फिर्यादीचे पती व स्वत: फिर्यादी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे आणि डॉ. विनोद श्रीखंडे यांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सप्टेंबर 2018 मध्ये हे सतरा कोटीहून अधिकचे कर्जप्रकरण उघडकीस आले.

याप्रकरणी वेगवेगळ्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. राहुरी येथील डॉ. रोहिणी भास्कर सिनारे, श्रीरामपूर येथील डॉ. उज्ज्वला रवींद्र कवडे, नगरमधील डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे या तिघांनी फिर्याद दिली होती. या तिघांच्या फिर्यादीनुसार सुरवातीला शहर बँकेचे संचालक मंडळासह 26 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

Advertisement

बनावट कागदपत्रांच्या आधारे या तिघांची प्रत्येकी 5 केाटी 75 लाख रुपयांची फसवणूक झाली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. त्यानंतर पोलीस तपासात वरील तीन डॉक्टरांचा समावेश आढळून आला.

त्यानुसार डॉ. रोहिणी सिनारे यांच्या फिर्यादीत या तीन डॉक्टरांना वर्ग करून घेत अटक करण्यात आली आहे. दरम्यान शहर सहकारी बँकेतील संचालक मंडळाला हाताशी धरून डॉ. निलेश शेळके याने अपहार केल्याची बाब तिघे डॉक्टर व त्यांच्या पत्नींनी चव्हाट्यावर आणली आहे.

आर्थिक गुन्हे शाखा गेल्या अडीच वर्षांपासून या गुन्ह्या तपास करीत आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत डॉ. शेळके व योगेश मालपाणी या दोघांना अटक केली आहे. शेळके विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. गुन्ह्यात नाव असलेले संचालक व बँकेतील अधिकार्‍यांना अद्यापपर्यंत अटक झालेली नाही.

Advertisement

आता मात्र, थेट फिर्यादींच्या पतीला आणि स्वत: फिर्यादीलाच अटक झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग असल्याचा ठपका ठेवत नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.