Ahmednagar News : बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप घातली आणि….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील नदीकाठ लगतच्या गावांमध्ये बिबट्यांचे हल्ले मोठया प्रमाणात वाढले आहेत. पाळीव व वन्य प्राण्यांना भक्ष करणारे बिबटे आता मनुष्यांवरही दिवसाढवळ्या हल्ले करत आहे.

अशीच घटना करजगाव-बोधेगाव रस्त्यावर शनिवारी (दि. २८) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. करजगाव येथील तरुण सोमनाथ कोतकर मित्र अमोल लोंढे यांच्यासोबत श्रीरामपूर येथून आपल्या मुलीसाठी औषधे घेऊन परतत असताना बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप घातली. त्यामुळे दोघेही तरुण गाडीवरून खाली पडले.

त्यांनी जोरजोरात आरडाओरडा करून गाडीचा हॉर्न वाजवल्याने बिबट्याने शेजारील उसाच्या शेतात धूम ठोकली. त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणत जखमी सोमनाथ कोतकर या तरुणाने घर गाठले. कोतकर यांच्या हाथ व पायावर गंभीर जखमा झाल्या असून श्रीरामपूर येथील खाजगी दवाखान्यात ते उपचार घेत आहेत.

या भागात वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती वेणूनाथ कोतकर, सरपंच शनिफ पठाण, माजी सरपंच बाळासाहेब आरंगळे, उपसरपंच गणेश कोतकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिगंबर नाना कोतकर, महेश कोतकर, नवनाथ कोतकर, युवा मित्र योगेश आरंगळे, त्रिंबक कोतकर आदींनी केली आहे.

‘करजगाव परिसरात बिबट्यांचे हल्ले चिंता वाढवणारे आहेत. ग्रामस्थांनी कुटुंबाची व पशुधनाची काळजी घ्यावी. वन विभागाकडे सदर भागात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीमार्फत वन विभागास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.’ – शनिफ पठाण (सरपंच करजगाव)