अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- लॉकडाऊनमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी घेऊन शासनाने सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सर्व लोकप्रतिनिधी या सर्वांच्या वेतनातून पन्नास टक्के कपात करून हा निधी कोरोना संसर्गामुळे बळी पडलेल्या सर्व सामान्य नागरिकांच्या नातेवाईकांना देण्यात यावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी केली आहे.
राज्य शासनच्या ‘ब्रेक द चैन’ आदेशाबाबत नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना लेखी निवेदन पाठविले आहे.
त्यात नाईक यांनी वरील मागणी केली आहे.नाईक यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासन सध्या पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कशाला कशाचा ताळमेळ राहिलेला नाही. पोलीस अधिकारी खून प्रकरणात तसेच स्फोटके प्रकरणात चौकशीसाठी अटकेत आहेत.
कोणाच्या आत्महत्या प्रकरणी मंत्री राजीनामा देत आहे तर कुणी मंत्री बार व्यवसाईकांकडून हप्ते वसुलीचे आरोप झाल्याने राजीनामा देत आहेत. त्यामुळे या सरकारकडून आता आणखी काही जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातील, या विषयी आशा बाळगणे फोलपणाचे ठरेल.