“दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रिपद मिळाले”

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : मंगळवारी दिल्लीत शिवसेनेचे १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात दाखल झाल्याने संसदीय पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले. त्यावरुन शिवसेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता बंडखोरांवर चांगलीच आगपाखड केली आहे.

महाराष्ट्राची सुत्रे आज संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्राची इतकी दारुण अवस्था कधीच झाली नव्हती. शिवसेना फोडणे व त्या फुटीचे नजराणे दिल्लीश्वरांच्या चरणी अर्पण करणे यातच मुख्यमंत्री शिंदे मश्गूल आहेत. राज्य बुडते आहे. ते बुडाले तरी पर्वा नाही, अशी सध्याच्या सत्ताधाऱ्यांची धारणा आहे. मात्र त्या प्रलयात महाराष्ट्राचा स्वभिमान व मराठी अस्मिताही गटांगळ्या खाताना दिसत आहे. हे गंभीर आहे, असे सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.

दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकला नाही, झुकणार नाही हा स्वाभिमानाचा मंत्र निदान यावेळी तरी दिल्लीने मोडून दाखवला. शिवसेनेचे १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी त्यांच्या गटात दाखल झाल्याने संसदीय पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले. याच मुद्द्यावरुन शिवसेनेनं जे फुटीर आमदार आहेत त्यांच्यापैकी अनेकांचे गोत्र हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच असल्याचा टोला लगावला आहे.

असं असलं तरी भाजपने अनेक राज्यांमध्ये सत्तेसाठी तडोजीडी केल्या असून तसाच प्रकार सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदही न देणारी भाजप आणि शिंदे गटाला मुख्यमंत्रिपद देण्यासाठी पायघड्या घालत आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

“महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा फैसला आता सर्वोच्च न्यायालयातच लागेल. मुख्यमंत्री शिंदे हे तातडीने दिल्लीस पोहोचले आहेत. दिल्लीभेटीत त्यांनी मोदी-शहांच्या चरणी शिवसेना खासदारांचाही नजराणा चढवला व उपकाराच्या ओझ्यातून आणखी थोडे मुक्त झाले, असेही शिवसेनेने म्हंटले आहे.

स्वतःला शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणारे शिंदे वारंवार दिल्ली दरबारी का जात आहेत, हा प्रश्नच आहे. शिंदे हे म्हणे मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले. हे आक्रित आहे. यापूर्वी शिवसेनेचे तीन मुख्यमंत्री झाले. त्यातील दोन भाजपबरोबरच्या ‘युती’त होते, पण एकही मुख्यमंत्री मंत्रिमंडळ काय व कसे करायचे याबाबत चर्चा करण्यासाठी कधी दिल्लीत गेला नाही. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रिपद मिळाले हे आता उघड झाले. दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकला नाही, झुकणार नाही हा स्वाभिमानाचा मंत्र निदान यावेळी तरी दिल्लीने मोडून दाखवला, अशी टीका शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून केली आहे.