ग्रामपंचायतीमध्ये आता ऑनलाइन व्यवहार करता येणार असून, येत्या १५ ऑगस्टपासून त्यानुसार व्यवहार करण्याचे आदेश केंद्र सरकारने काढले आहेत, त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी तशी तयारी सुरू केली असून,आता ग्रामपंचायतमध्ये घरपट्टी व पाणीपट्टीचा भरणा ऑनलाइन करता येणार आहे. असल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानचे प्रकल्प संचालक ए. एस. भंडारी यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना भंडारी म्हणाले की, केंद्र सरकारने ग्रामपंचायतींना डिजिटल पेमेंटसाठी ‘भीम यूपीआय’ व ‘क्यूआर कोड’चा वापर करणे बंधनकारक केले आहे.
‘राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानं चे प्रकल्प संचालक ए. एस. भंडारी यांनी यासंदर्भातील केंद्र सरकारच्या सूचनेचे परिपत्रक जिल्हा परिषदांना दिले आहे. सर्व ग्रामपंचायतींना ‘महा-ई-ग्राम’ प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना केंद्र सरकारने यापूर्वीच दिल्या आहेत.
या पोर्टलमार्फत ग्रामपंचायत करभरणा करण्यात येऊन स्वयंचलितपणे संबंधित ग्रामपंचायतीच्या खात्यात वर्ग होत आहे. या पोर्टलवरून कर भरण्यासाठी नेट बँकिंग, यूपीआय व क्रेडिट-डेबिट कार्डच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांना आता घरबसल्या ग्रामपंचायत कर भरता येणार आहे.