अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- दोन दिवसांपासून आपल्या घराचा बंद असलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लाईटच्या पोलवर चढलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला.
ही दुर्घटना श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे घडली आहे. विलास अशोक देसाई असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील शेतकरी विलास अशोक देसाई यांच्या राहत्या घराची लाईट मागील दोन दिवसापासून बंद होती.
त्यामुळे काल दुपारी संबधित कर्मचाऱ्याशी चर्चा करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे गावातील वीजपुरवठा बंद असल्याने स्वःतच्या घराजवळ असलेल्या पोलवर मृत तरुण विलास गेला असतांना त्याला विजेचा जबर शॉक बसला अन त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनामुळे संपूर्ण गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.
मयत विलास हा घरात एकुलता एक कमावता मुलगा होता. त्याच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, १ मुलगा व २ मुली असा परिवार आहे. महावितरणच्या गलथान कारभारा विषयी नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.