खा.सुजय विखेंचे डोळे उघडले नाहीतर आम्ही आत्मदहन करणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथील डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे २५ कोटी ३६ लाख रुपये देणी खा.डॉ.सुजय विखे यांनी त्वरित न दिल्यास कामगारांच्या आंदोलनामुळे डॉ.विखे यांचे डोळे उघडले नाहीतर कामगार सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा इंद्रभान पेरणे यांनी दिला आहे.

खा.डॉ.सुजय विखे यांच्या ताब्यात कारखाना आल्यापासून थकीत वेतन, वेतन आयोगाचा थकीत फरक, भविष्य निर्वाह निधी, उपादान निधी, रिटेन्शन अलौन्ससची थकबाकी अदा करावी यासाठी कामगारांनी आजपासून उपोषण सुरू केले आहे.

उपोषणाला बसल्यानंतर कामगार नेते इंद्रभान पेरणे यांनी कामगारांच्या थकीत देणीबाबत सांगितले की, राहुरी तालुक्यातील कामगारांनी डॉ.तनपुरे साखर कारखान्यासाठी त्याग केला आहे.परंतू कामगारांच्या त्यागाची तालुक्यातील राजकीय व्यक्तींना नाही.

त्यामुळे कामगारांच्या हक्काचे देणे घेण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात कामावर असलेले कामगार, सेवानिवृत्त कामगार, मजूर हजरीवरील आदी सहभागी झाले आहेत. या आंदोलनातून खा.डॉ.सुजय विखे व व्यवस्थापणाचे डोळे उघडले नाही तर कामगार कोणत्याही क्षणी आत्मदहन करतील.

त्यामुळे संचालक मंडळाने व विखे यांनी कामगारांचा अंत पाहू नये.कामगारांनी आता टोकाची भूमिका घेतली आहे. त्यासाठीच कामगार नेत्यांनी शनी देवता आंदोलनापूर्वी हात ठेवून शपथ घेतली आहे. या शपथीमुळे कामगारांचे आंदोलन यावेळी तालुक्यातील कोणतेही राजकीय पुढारी मोडित काढू शकत नाही असे पेरणे यांनी सांगितले.

कामगारांचे २५ कोटी ३६ लाखाची थकबाकी खा.डॉ.सुजय विखे मागिल ५ वर्षात वेळोवेळी दिलेल्या शब्दप्रमाणे पूर्ण करावी अन्यथा कामगार उपोषण दरम्यान विविध प्रकारचे आंदोलन छेडणार आहेत. यावेळी मात्र कारखाना व्यवस्थापन व डॉ.सुजय विखें यांनी कामगारांच्या मागण्याबाबत लेखी आश्वासन तहसीलदार अथवा जिल्हाधिकारी यांना द्यावे

त्यांच्या मार्फतच लेखी आश्वासन स्वीकारण्यात येईल असे इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सीताराम नालकर, राजेंद्र सांगळे, सुरेश तनपुरे, बाळासाहेब तारडे, नामदेव शिंदे यासह कामगारांनी दिला आहे. या आंदोलनात २०० ते २५० कर्मचारी सहभागी झाले आहेत.