file photo

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाने मुक्काम ठोकला असून, पुढील चार दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाकडून कोकणसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोकणला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

बंगाल खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पावसाची शक्यता वाढली आहे. पुणे शहरात साेमवारी दिवसभर ढगाळ हवामान हाेते. अधूनमधून सूर्य दर्शन हाेते. तापमानातही वाढ झाली हाेती, सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.

पुढील चार दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काेकण, मुंबई, पालघर जिल्ह्यात पुढील चार दिवसांत जाेरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विशेषत: नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा विभागात जाेरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही स्थिती नऊ तारखेपर्यंत राहू शकते. त्यानंतर पावसाचा जाेर कमी हाेण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम राज्यातील हवामानवर दिसून येत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात आजपासून ते 9 सप्टेंबरपर्यंत अतिमुसळधार पाऊस होणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी पुढील चार दिवसांच्या हवामानाबद्दलची माहिती ट्वीट करून दिली आहे.

राज्यात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने परत दिला आहे. विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा प्रभाव सर्वदूर असेल. 7 व 8 सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल,

त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, रत्नागिरीला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला. नंदुबार जिल्हा वगळता सर्वदूर पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सोलापूर आणि सांगली दोन जिल्ह्यात कमी पाऊस होणार

ऑरेंज अलर्ट मराठवाडा – परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर कोकण- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग